Maharashtra Weather News : उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढलेला असतानाच आता राज्यात येत्या काही दिवसांमध्ये किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवली जाणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. गेल्या 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सकाळच्या वेळीसुद्धा तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळालं. हवामानाची ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस कायम असेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसांत थंडीचा कडाका वाढणार आहे, तर कोकण पट्ट्यामध्ये वातावरण आल्हाददायक असणार आहे.
हवाना विभागाच्या माहितीनुसार बुधवारी जळगावात 9 अंशांच्या किमान तापमानाची नोंद झाली तर, राज्याच्या काही भागांमध्ये मात्र किमान तापमान अंशत: वाढलं. राज्य आणि देशातील सद्यस्थिती पाहता हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण कर्नाटक ते विदर्भारम्यान वाहणाऱ्या वाऱ्यांमुळं हवेतील आद्रर्तचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच उत्तर भारतात थंडीची लाट कायम असल्यामुळं आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुढील चार-पाच दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे.
राज्यात सध्या उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर भागात मोठ्या प्रमाणात धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. इथं असणाऱ्या सततच्या ढगाळ हवामानामुळे बळीराजाची चिंता आणखी वाढली आहे. दरम्यान ढगांचं हे सावट सरलं म्हणजे बळीराजाची चिंताही मिटणार आहे हे नक्की.
राज्यात सध्या सुरु असणारा थंडीचा कडाका पाहता ही थंडी येत्या काळात ही थंडी हिवाळी सहलींचा बेत सुपरहिट ठरवणार असंच चित्र पाहायला मिळत आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली या भागांमध्ये दाट धुक्याची चादर आणि सोबतच झोंबणारे गार वारे असं वातावरण असणार आहे. त्यामुळं थंडीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही एखाद्या हिवाळी सहलीचा बेत आखत असाल तर, ही सहल थंडीच गाजवणार असं म्हणणं गैर ठरणार नाही.