Maharashtra Weather News : अवकाळी पावसानं राज्याच्या विदर्भ आणि मराठवाडा भागात थैमान घातलेलं असताना आता हाच पाऊस त्याची तीव्रता वाढवत वादळी स्वरुप धारण करणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, इथं मुंबई आणि कोकणात मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सध्या बहुतांश भागांमध्ये चढ उतार पाहायला मिळत असून, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/3KnfA9cwQQ— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 24, 2024
पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाच्या वतीनं मुंबईसह ठाणे, पालघर, रायग़ड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, दुपारी हा दाह अधिक जाणवणार असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय नागरिकांना शक्य असल्यास घराबाहेर पडणं टाळा असंही आवाहन केलं. दरम्यान, कोकणातही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असला तरीही काही भाग मात्र या उकाड्याला अपवाद ठरणार असून, तिथं मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 37 ते 40 अंशांच्या घरात राहील, तर किमान तापमान 27 ते 32 अंशांमध्ये राहण्याची शक्यता आहे.
देश स्त रावरही हवामानात बरेच बदल अपेक्षित असल्याची माहिती आयएमडीनं दिली. पूर्व आणि दक्षिण उपखंडामध्ये पुढल्या पाच दिवसांपर्यंत उष्णतेच्या लाटेस्वरुप तापमान राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला. तर, उत्तर पश्चिम भारतामध्ये 26 ते 28 एप्रिलदरम्यान सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आली.
पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थानात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असली तरीही उष्णतेपासून मात्र इथं कोणताही दिलासा मिळणार नाही. पूर्वोत्तर भारतालाही पुढील 48 तासांमध्ये पावसाचा तडाखा बसणार आहे. तर, उत्तरभारतामध्ये तापमानात घट नोंदवली जाणार आहे, असं हवामान विभागानं स्पष्ट केलं.