Maharashtra Weather News : मान्सूनच्या (Monsoon) आगमनानंतर जून महिन्यात हा पाऊस परतणार की दगा देणार? अशी धास्ती लागलेली असतानाच महिन्याच्या अखेरच्या चार दिवसांमध्ये पावसानं दमदार बॅटिंग करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या कोकण पट्ट्यामध्ये आतापर्यंत काही अंशी समाधानकारक पावसानं हजेरी लावली असली, तरीही येत्या काळात शेतीच्या कामांसाठी आणखी पावसाचीच कामना बळीराजा करताना दिसत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सूनच्या पावसामुळं कोकणात आतापर्यंत 100 मिलिमीटरहून अधिक बरसात झाली असून, येत्या 48 तासांमध्ये कोकणातील किनारपट्टी भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी असेल, असं सांगण्यात आलं आहे.
अरबी समुद्रातही सध्या मान्सून सक्रिय होत असून, त्यामुळं राज्याला येत्या काळात फायदा होताना दिसणार आहे. मान्सून्या या प्रगीतमुळं कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, विदर्भाच्या बहुतांश भागांमध्येही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि अधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वाद ली पावसाची हजेरी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहणार असल्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला महाराष्ट्रापासून केरळपर्यंतच्या भागामध्ये हवेचा दक्षिणोत्तर पट्टा सक्रिय असून, अरबी समुद्राप्रमाणंचबंगालच्या उपसागरामध्येही चक्रिय वारे निर्माण होताना दिसत आहेत. ज्यामुळं राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस उघडीप देताना तापमानात काही अंशी वाढ होताना दिसत आहे.
महाराष्ट्र व्यापणारा मान्सून आता टप्प्याटप्प्यानं पुढील वाटचाल करत देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांच्या दिशेनं वळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं उकाड्यानं होरपळून निघालेल्या दिल्ली, हरियाणा या भागांना किमान दिलासा मिळताना दिसत आहे. मान्सूननं सध्या गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख इथपर्यंत मजल मारली असल्यामुळं पुढील 48 तास देशभरात मान्सूनसाठी पोषक वातावरणाचे असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.