Maharashtra Weather News : दडी मारून बसलेल्या पावसानं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दारी हजेरी लावली असून, आता राज्याच्या बहुतांश भागांवर काळ्या ढगांची चादर पाहायला मिळत आहे. पावसानं पुन्हा एकदा राज्याचा विदर्भ, मराठवाडा आणि कोकण पट्ट्यातील दक्षिणेकडे असणारा भाग व्यापला आहे. ज्यामुळं या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरुपातील पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबई शहरसुद्धा इथं अपवाद ठरलेलं नाही. कारण, मुंबईमध्येही अधूनमधून पावसाच्या सरी हजेरी लावताना दिसत आहेत.
पावसानं परतीची वाट धरली असाच अनेकांचा समज झाला होता. पण, हा गैरसमज असल्याचं सिद्ध करत आता हा पाऊस परतल्यामुळं अनेकांचीच त्रेधातिरपीट उडताना दिसत आहे. कुठे मध्येच लख्ख प्रकाशामध्येही पावसाच्या सरींची बरसात होत असल्यामुळं वातावरण क्षणात बिघडताना दिसत आहे.
राज्यात सध्या ढगाळ वातावरणामुळं उष्णतेचा दाह बऱ्याच अंशी कमी झाला आहे, तर किनारपट्टी भाग मात्र इथं अपवाद ठरत आहेत. दरम्यान पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्य्ता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
तामिळनाडूच्या उत्तर भागावपासून आंध्र प्रदेशच्या दक्षिणेपर्यंत वाऱ्यांची चक्राकार स्थिती पाहता सध्या राज्यावरही पावसाची कृपा पाहायला मिळत आहे. परिणामी येत्या 24 तासांमध्ये राज्यातील रत्नागिरी, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसणार आहेत. त्यामुळं या पावसाची सोय करूनच घराबाहेर पडणं उत्तम.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/yUwgwS0fbl
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 20, 2024
मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपातील पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, शहरात सर्वसाधारणपणे आकाश ढगाळ राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, तापमानाचा आकडा कमाल 30 अंश सेल्सिअस आणि किमान 26 अंश सेल्सिअस इतका असेल.