Weather News : मागील काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमानात लक्षणीयरित्या घट नोंदवण्यात आली होती. ही घट गुरुवारी मात्र कमाल तापमानाच्या वाढीच्या रुपात बदलली. पण, शुक्रवारपासून हवामानात पुन्हा बदल होणार असून, मुंबई वगळता उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र गारठणार असल्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार निफाड, धुळ्यामध्ये किमान तापमानात घट नोंदवली जाऊ शकते. तर, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 11 अंशांपर्यंत किंवा त्याहूनही कमी असल्याची नोंद केली जाऊ शकते.
राज्यातील काही जिल्हायंमध्ये तापमान 10 अंशांच्याही खाली उतरल्यामुळं या भागांमध्ये (Cold wave) थंडीची लाट आल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आयएमडीच्या माहितीनुसार सध्या देशात हिमालयाच्या पर्वतीय क्षेत्रामध्ये पश्चिमी झंझावात सक्रिय आहे. ज्यामुळं 22 आणि 23 डिसेंबरला काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, मुंबईत असंच काहीसं चित्र दिसू शकतं. तर, देशाच्या काही भागांवर दाट धुक्याची चादर असेल.
धुक्याची चादर, शीतलहरी आणि मधूनच होणारा पावसाचा हलका शिडकावा असं एकंदर हवामानाचं चित्र पुढील 24 तासांमध्ये देशाच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. ज्यामुळं रात्रीच्या वेळचं तापमान 6 ते 8 अंशांच्या घरात असून दिवसा हेच तापमान 24-25 अंशांदरम्यान राहण्याची चिन्हं आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशातील उत्तराखंड, हरियाणा आणि पंजाब प्रांतामध्ये थंडीचा कडाका वाढणार अला तरीही मधूनच पावसाच्या हलक्या सरींची बरसातही होऊ शकते. तर, काश्मीरमध्ये आता पुढच्या 40 - 45 दिवसांसाठी थंडीचं प्रमाण वाढणार आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार सध्या काश्मीरमध्ये चिल्लई कलां सुरु झाला आहे. अर्थात पुढील 40 दिवसांसाठी इथं रक्त गोठवणारी थंडी पडणार असून, बहुतांश भागांमध्ये तापमान शून्याचाही बरंच खाली जात असून, येत्या काळात ही थंडी आणखी वाढणार आहे. ज्यामुळं काश्मीरच्या खोऱ्यावर बर्फाची चादर पाहायला मिळेल. हिमाचल प्रदेशातील पर्वतीय भागातही हिमवृष्टी वाढणार असून, हे क्षेत्र बर्फानं अच्छादून जाणार आहे.