Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढलेला असल्यामुळं त्या दिशेनं राज्याकडे येणारे थंड वारे इथंही परिणाम दाखवताना दिसत आहे. उत्तरेत थंडीचा कडाका कायम राहणार असून, येत्या काही दिवसांमध्ये थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडसाठी गुरुवाकरी थंडीचा रेड अलर्टही देण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि काश्मीरमध्ये वाढलेल्या थंडीचे परिणाम महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशापर्यंत दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील किमान तापमानात सातत्यानं घट नोंदवण्यात आली असून, राज्यातील किमान तापमान 10 अंशांहून कमी असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी निफाड येथे राज्यातील सर्वात नीचांकी म्हणजेच 4.4 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. तर, धुळ्यामध्ये 4.7 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं.
तिथं विदर्भात अवकाळीचा इशारा दिलेला असतानाच इथं महाराष्ट्राच्या उत्तरेकडे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानाच मोठी घट होऊ शकते असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रातही परिस्थिती वेगळी नाही. धुळे, नाशिक, निफाड, जळगाव आणि पुण्यामध्ये तापमान 10 अंशांच्याही खाली येऊ शकतं.
मराठवाडा आणि विदर्भावर मात्र चक्रिय वाऱ्यांची स्थिती कायम असल्यामुळं ढगांचं सावट असेल. यामध्ये गारठाही तितकाच जाणवणार आहे. पुढील 48 तासांमध्ये या भागांमध्ये तापमानात मात्र काही अंशांची वाढ नोंदवली जाऊ शकते.