नितेश महाजनसह, झी 24 तास, जालना : कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा महाकाय होती, आणि आता तिसरी लाट (Third Wave) ही दुसऱ्या लाटेपेक्षा महाभयंकर असेल की काय, अशी भीती आहे. कारण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्यात जवळपास ५० लाख रूग्ण आढळण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तवलीय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तिसऱ्या लाटेसाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत.
तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ?
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत तब्बल 50 लाख कोरोना रुग्णसंख्या होऊ शकते अशी भीती वर्तवण्यात आली आहे. यातले 25 लाख रुग्ण हे सरकारी आरोग्य सेवेवर अवलंबून असतील, शिवाय, तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे, तब्बल 5 लाख लहानग्यांना कोरोना होण्याचा धोका तज्ज्ञांच्या समितीने वर्तवला आहे. त्यापैकी अडीच लाख मुलांना क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्याची वेळ येईल तर 8 ते 10 हजार मुलांना हॉस्पीटलमध्ये उपचार घ्यावे लागतील असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
सज्ज राहण्याच्या आरोग्य विभागाला सूचना
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभाग तयारीला लागला असून या लाटेला थोपवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स स्थापन करण्यात येऊन आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
औषधांचा पुरवठा वाढवण्याची गरज
राज्य सरकारने सध्याच्या अंदाजानुसार यासाठी 893 कोटींची तरतूद केली आहे. तिसऱ्या लाटेत तब्बल 8 लाख रेमडेसिवीरची गरज असणार आहे. ही उपलब्ध करुन ठेवण्याची तयारी राज्य सरकार करतं आहे. दुसऱ्या लाटेत टोसिलीझुअॅप हे इंजेक्शनही मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं. दुसऱ्या लाटेत ही 4000 इंजेक्शन लागली होती. तिसऱ्या लाटेत 10,000 इंजेक्शन मागवण्याची तयारी राज्य सरकारने केलीय. याशिवाय 1 कोटी 50 लाख पॅरासिटॅमॉल गोळ्यांची व्यवस्था करावी लागणार आहे. तसंच 1 कोटी 25 लाख आरटीपीसीआर (Testing Kits) तर 88 लाख अँटिजेन टेस्ट (Antigen Tests) कीट खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जेणेकरुन, लक्षणं असणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करणं शक्य होऊ शकतं.
90 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवली होती. ट्रेन आणि विमानाने ऑक्सिजन आणावा लागला होता. हे पाहता तिसऱ्या लाटेआधी तब्बल 90 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. त्यासाठी राज्य सरकारनेही तयारी केली आहे. पहिल्या लाटेत महाराष्ट्रातली रुग्णसंख्या 19 लाख होती. दुसऱ्या लाटेत या संख्येने 40 लाखांचा टप्पा ओलांडला. कोरोना विषाणूचे नवनवे व्हॅरिएंट्स येत असल्यामुळे तिसऱ्या लाटेतल्या रुग्णसंख्येचा आकडा 50 लाखांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुरू केलीय. पण यासाठी नागरिकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे.