Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय? महायुतीच्या विरोधातच भूमिका, अजितदादांना टेन्शन!

Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय आहे याची चर्चा सध्या सुरू आहे. कारण मागच्या काही दिवसांमधील भुजबळांची (Chhagan Bhujbal) वक्तव्य ही महायुतीच्या विरोधातील आणि मविआला पाठिंबा दर्शवणारी आहेत.

सौरभ तळेकर | Updated: May 31, 2024, 08:36 PM IST
Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय? महायुतीच्या विरोधातच भूमिका, अजितदादांना टेन्शन! title=
Maharastra Politics Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal On Jitendra Awhad : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भूजबळ (Chhagan Bhujbal) यांची मागल्या काही दिवसांमधली ही वक्तव्य चर्चेत आहेत. या वक्तव्यांवरून भुजबळांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. भुजबळांची मागील काही दिवसांमधली बरीचशी विधानं ही महायुतीच्या विरोधातली आहे. विधानसभेसाठी 90 जागांची मागणी, मनुस्मृतीवरून झालेला वादात आव्हाडांची (Jitendra Awhad) केलेली पाठराखण यासारख्या अनेक विषयांवर भुजबळांनी केलेली विधानं महायुतीच्या भूमिकेशी विसंगत आहेत.

भुजबळ काय म्हणाले ?

काय समज द्या, समज द्या, असं लावलंय. मी माझ्या पक्षात बोलणारच. मी जागावाटपाचा मुद्दा माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीत मांडला होता.  मी आता मीडियासमोर बोलणार नाही. मात्र मला जे काही सांगायचं असतं, ते मी पक्षाला सांगेन. आम्ही महायुतीमध्ये येताना भाजप नेते काय बोलले होते, त्याची आठवण फक्त मी त्यांना करुन दिली, असं म्हणत भुजबळांनी आपली भूमिका मांडली होती.

मनुस्मृती प्रकरणावरुन बाबासाहेबांचा फोटो फाडल्यापकरणी आव्हाड यांच्याकडून अनवधानाने चुक झाली. त्याची त्यांनी माफीही मागितली. त्यामुळे त्यावरुन विनाकरण राजकारण करु नये, असं म्हणत आव्हाडांची पाठराखण केली होती.

अमित शहांनी लोकसभेला नाव सुचवूनही उमेदवारी मिळाली नाही आपली अवहेलना झाल्याचं म्हणत भुजबळ यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत नाराजी व्यक्त केली. तर उद्धव आणि पवारांबद्दल जनतेमध्ये सहानुभूती असल्याचं म्हणत भूजबळ यांनी महायुतीमध्ये बॉम्ब टाकला होता. तर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांनाही टोला लगावला होता. त्यामुळे अनेकांचा भूवया उंचावल्या होत्या. तर होर्डिंग प्रकरणात त्यांनी उद्धव ठाकरेंची बाजू घेतली होती.

दरम्यान, छगन भुजबळांची ही वक्तव्य विचार करायला लावणारी आहेत. भुजबळ जरी आपण नाराज नसल्याचं सांगत असले तरी त्यांच्या मनात काय चाललंय हे सांगायला राजकीत पंडितांची गरज नाहीय. समझने वालों को इशारा काफी है, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.