Mahayuti Press Conference: एकनाथ शिंदे सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना आपण शिवसेनेच्या वतीने मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली असल्याची माहिती दिली. भाजपाच्या, शिवसेनेच्या सर्व आमदारांची इच्छा आहे. त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
"मी एकनाथ शिंदे यांना भेटून शिवसेनेच्या वतीने त्यांना मंत्रिमडंळात राहण्याची विनंती केली आहे. शिवसेना, महायुतीच्या सर्व आमदारांची तशी इच्छा आहे. त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
"आम्ही महायुतीच्या वतीने राज्यपालांना पत्र दिलं आहे. राज्यात नवं मंत्रिमंडळ स्थापन कऱण्यासाठी दावा केला आहे. राज्यपालांनी आमचा दावा घेतल्यानंतर आम्हाला 5 तारखेला संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधीची वेळ नेमून दिली आहे. आज भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, जनस्वराज्य, युवा स्वाभिमान, रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती झालेली आहे. या सगळ्यांच्या सहीचं पत्र दिलं आहे," अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
"मी शिवसेनेचे अध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानते. त्यांनी शिवसेनेच्या वतीने माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आहे. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. तसंच राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवार यांनीही त्याच आशयाचं पत्र दिलं आहे. आमच्या मित्रपक्षांनीही तशाच प्रकारची विनंती केली आहे. सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून राज्यपालांनी निमंत्रित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उद्या 5.30 वाजता आझाद मैदानात हा सोहळा पार पडला जाणार आहे. तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित असतील," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
"संध्याकाळी किती लोकांचा शपथविधी होईल याची माहिती दिली जाईल. सगळे निर्णय यापूर्वीही एकत्र घेतले असून यापुढेही घेतले जातील. मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपह हे आमत्यासाठी फक्त तांत्रिक व्यवस्था आहे. आम्ही तिघे यापूर्वीही एकत्रित निर्णय घेत आले असून, यापुढेही घेत राहू," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.