Maharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट

Maharastra Politics : महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. 48 पैकी फक्त 17 जागांवर महायुतीचे खासदार निवडून आले. मात्र आता या निकालानंतर महायुतीत ठिणगी पडलीय. खास करुन अजित पवारांबाबत भाजप आणि शिंदेंचे आमदारही नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Jun 18, 2024, 09:07 PM IST
Maharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट title=
Special Report On Mahayuti Politics

Special Report On Mahayuti Politics : लोकसभेच्या निकालात महायुतीचा राज्यात धुव्वा उडाला. आता महायुतीत यावरुन रंगलाय कलगीतुरा.. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात या पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडण्यात आलं. आता भाजप आणि शिवसेना शिंदेंच्या आमदारांनीही हाच सूर आळवल्याची माहिती आहे. भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांना आता अजित पवार नकोसे झाल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवारांच्या पक्षाची मते आम्हाला मिळालीच नाहीत अशी तक्रार भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे. माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ आणि कोल्हापूर अशा मतदारसंघांचा यात समावेश आहे. 

अजितदादांमुळे महायुतीला फटका? 

माढ्यात भाजपचे रणजितसिंह निंबाळकरांचा धैर्यशील मोहितेंकडून 1 लाख 20 हजारांवर मतांनी पराभव झाला. तर करमाळा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे संजय शिंदे आमदार आहेत. याच करमाळ्यात रणजिंतसिंह निंबाळकर 41,151 मतांनी पिछाडीवर आहे. तसेच माढा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे बबनराव शिंदे आमदार आहेत. माढ्यात निंबाळकर 52,515 मतांनी पिछाडीवर होते. तर फलटणमध्ये चित्र वेगळंय. अजित पवार गटाचे दीपक चव्हाण आमदार आहेत. यात फलटणमध्ये निंबाळकरांना 16,928 मतांचं अधिक्य आहे. फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांच्या गटानं भाजपविरोधात काम केल्याचं जाहीरपणे बोललं गेलं.

माढा लोकसभा मधला पराभव भाजपच्या जिव्हारी लागलाय. आता माढामध्ये भाजप अजित पवारांच्या आमदाराचं काम करणार नसल्याचा इशारा स्थानिक भाजप नेत्यांनी दिलाय. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाबाबतची महायुतीतली खदखद ही फक्त माढापुरती मर्यादित नाही. सोलापुरात भाजपच्या राम सातपुतेंचा प्रणिती शिंदेंकडून 74 हजारांवर मतांनी पराभव झाला. मोहोळ विधानसभेत अजित पवार गटाचे यशवंत माने आमदार आहेत. पण मोहोळमध्ये अजित पवार गटाचे आमदार असूनही राम सातपुते 63,152 मतांनी पिछाडीवर होते.

दिंडोरीतही भाजपच्या माजी मंत्री डॉ. भारती पवारांचा पराभव झाला.. विशेष म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे 4 आमदार आहेत. खुद्द मंत्री छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघातही भारती पवार पिछाडीवर पडल्या. दिंडोरीत भाजपच्या डॉ. भारती पवारांचा 1 लाख 13 हजार मतांनी पराभव झाला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार आहेत. अजित पवार गटाच्या 4 आमदारांच्या आतदारसंघात भारती पवार पिछाडीवर होत्या.

दरम्यान, कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाडगे कागलचे असूनही मंडलिकांना फारसं मताधिक्य मिळालं नाही. महायुतीत दुसऱ्यात तिसरा नको अशी भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांची भूमिका असल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकसभा पराभवानंतर महायुतीमधली अंतर्गत खदखद उफाळून आलीय.