पुण्याच्या रस्त्यावर बाईकस्वाराला चिरडणारी मर्सिडीज बेंज कोणाच्या मालकीची? माहिती आली समोर

Pune Accident:  पुणे पोर्शे कार अपघातानंतर अग्रवाल परिवार समोर आला होता. आता मर्सिडीज बेंझ कारच्या मालकाची माहितीदेखील समोर आली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 18, 2024, 09:08 PM IST
पुण्याच्या रस्त्यावर बाईकस्वाराला चिरडणारी मर्सिडीज बेंज कोणाच्या मालकीची? माहिती आली समोर title=
Pune Mercedes Accident

Pune Accident: पुण्याच्या रस्त्यांवर धावणाऱ्या महागड्या गाड्यांखाली चिरडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. त्यामुळे पुण्याच्या रस्त्यांवर नक्की चाललंय काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पोर्शे कारच्या घटनेची देशभरात चर्चा झाली. यानंतरही अपघाताच्या घटना वारंवार समोर येताना दिसतायत.पुण्यात गोल्फ कोर्स चौकात मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय. पुणे पोर्शे कार अपघातानंतर अग्रवाल परिवार समोर आला होता. आता मर्सिडीज बेंझ कारच्या मालकाची माहितीदेखील समोर आली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात आलिशान मर्सिडीज बेंज भरधाव वेगात धावत होती. या गाडीखाली एक दुचाकीस्वार चिरडला गेला. या घटनेतच त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सर्वांच्या डोळ्यासमोर दुचारीकीस्वाराचा मृत्यू झाला. 

काय घडली घटना?

41 वर्षांचे केदार मोहन चव्हाण हे  गोल्फ कोर्स चौकातून आपल्या बाईकने जात होते. यावेळी त्यांची दुचाकी स्लिप झाली आणि केदार चव्हाण रस्त्यावर कोसळले. 

याचवेळी पाठीमागून मर्सिडीज बेंज गाडी येत होती. नंदू अर्जुन ढवळे हा चालक गाडी चालवत होता. त्याला गाडीचा वेग नियंत्रणात आणता आला नाही. त्यामुळे केदार यांच्या अंगावर गाडी गेली. यामध्ये केदार चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. 

डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. केदार यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजतात येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

आरोपी कारचालक नंदू ढवळे याला ताब्यात घेण्यात आले.  वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले.  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कार कोणाच्या मालकीची?

अपघातग्रस्त मर्सिडीज कारचा नंबर MH12NE5188 असा आहे. ही कार सीरम इन्स्टिट्यूटच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे.