यवतमाळमध्ये व्हॅन दरीत कोसळली; आठ जणांचा मृत्यू

या भीषण अपघातात आठ जण ठार झाले, तर दहाहून अधिक जण जखमी झाले आहेत.

Updated: Feb 16, 2020, 09:50 PM IST
यवतमाळमध्ये व्हॅन दरीत कोसळली; आठ जणांचा मृत्यू

यवतमाळ: यवतमाळच्या जोडमोहाजवळील वाढोणा खुर्द येथे रविवारी संध्याकाळी मालवाहू गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढोणा खुर्द या गावाजवळ ही घटना घडली. या मालवाहू वाहनातील लोक कोटेश्वर येथे आपल्या नातेवाईकाचे अस्थीविसर्जन करून परतत होते. त्यावेळी वाढोणा खुर्द गावानजीक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्त्यालगत असलेल्या झाडांवर जाऊन आदळली. यानंतर गाडी पलटी मारत दरीत जाऊन कोसळली. 

या भीषण अपघातात आठ जण ठार झाले, तर दहाहून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जखमींना यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

महादेव बावनकर (वय ५३, रा. शेंदुरजनाघाट), किसन कळसकर (वय ५५), महादेव चंदनकर (वय ५८), वाहनचालक अमर आत्राम (वय ३२) तिघेही राहणार जोडमोहा आणि गणेश चिंचाळकर (वय ५२, रा. महागाव) अशी मृतांची नावे आहेत. तर एका मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.