उरण येथील ओएनजीसीत वायुगळतीने स्फोट, पाच जणांचा मृत्यू

 ओएनजीसीच्या प्रकल्पात वायुगळतीमुळे मोठा स्फोट होऊन आग भडकली.  

Updated: Sep 3, 2019, 02:33 PM IST
उरण येथील ओएनजीसीत वायुगळतीने स्फोट, पाच जणांचा मृत्यू title=

नवी मुंबई : उरणमध्ये ओएनजीसीच्या प्रकल्पात वायुगळतीमुळे मोठा स्फोट होऊन आग भडकली. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी ६.४७ वाजण्याच्या सुमाराला वायुगळती झाली. त्यानंतर सीआयएसएफच्या अग्निशमन दलाचे तीन जवान आणि ओएनजीसीचे अधिकारी वायुगळती थांबवत असताना मोठा स्फोट होऊन ही आग भडकली. आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

कारखान्यात नाफ्ता वायूच्या टाक्या जमिनीखाली होत्या. त्या टाक्यांमधून गळती झाल्यामुळे ही आग लागली. आगीत टाक्यांमधल्या नाफ्ता वायूने पेट घेतला. ही आग सीआयएसएफ, ओएनजीसीच्या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. या आगीत सीआयएसएफच्या अग्निशमन दलाचे तीन जवान आणि ओएनजीसीचे अधिकारी यांचा या आगीत मृत्यू झाला.

सीआयएसएफच्या अग्निशमन दलाचे जवान ई नायका, सतीशप्रसाद कुशवाह, एम के पासवान आणि ओएनजीसीचे अधिकारी सी. एन. राव यांना या दुर्घटनेत हौतात्म्य आले. आग वेळीच आटोक्यात आल्याने फार मोठा अनर्थ टळला.

सीआयएसएफच्या जवानांनी आणि ओएनजीसीच्या अधिकाऱ्याने प्राणांचे बलिदान देऊन नवी मुंबई, उरण, पनवेल भागाला फार मोठ्या संकटातून वाचवले. ओएनजीसीमध्ये करण्यात येणाऱ्या इंधर प्रक्रियेवर कुठलाही परिणाम झालेला नाही. हाजिरा प्रकल्पामध्ये गॅस वळविण्यात आल्याचं वृत्त आहे.