श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ: यवतमाळच्या पुसद शहरात मंगळवारी हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली. या व्यक्तीचे नाव गौतम कांबळे असे आहे. गौतम कांबळे हे चार दिवसांपूर्वीच पत्नीसह पुण्याहून तब्बल ५०० किलोमीटर अंतर पायी चालत पुसदच्या हुडी या आपल्या गावी पोहोचले होते. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असल्यामुळे ते पत्नीसह शेतात राहत होते. गावातील लोकांनी त्यांना पुसद शहरातील केंद्रावर जाऊन तपासणी करून घ्यायला सांगितले. त्यामुळे हे जोडपे पुन्हा चालत पुसद बसस्थानकावर जाण्यासाठी निघाले. मात्र, वाटेतच लक्ष्मीनगर परिसरात गौतम कांबळे अचानक खाली बसले आणि गतप्राण झाले.
Lockdown 4.0: वाचा राज्यात काय सुरु आणि काय बंद राहणार?
गौतम कांबळे यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असल्यामुळे कोणीही त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले नाही. तब्बल दोन तास त्यांचा मृतदेह रस्त्यावरच पडून होता. अखेर काही नागरिकांनी आरोग्य विभागास सूचना दिली. यानंतर आरोग्य विभागाची रुग्णवाहिका त्याठिकाणी आली. मात्र, त्यामध्ये डॉक्टरच उपलब्ध नव्हता. अखेर उपविभागीय अधिकारी डॉक्टर व्यंकट राठोड यांनी स्वत: गौतम कांबळे यांना तपासले. यानंतर त्यांना रुग्णालयातही हलवण्यात आले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
कंटेन्मेंट झोनमध्ये गेल्याप्रकरणी भाजप आमदारावर गुन्हा दाखल
या घटनेमुळे यवतमाळमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी पुसदमध्ये मुंबईहून परतलेला एक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. याशिवाय, हातावर शिक्का असलेले अनेकजण घराबाहेर पडत असल्याचेही निदर्शनास येत असल्याने प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.