मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठा आंदोलन ४७ दिवसांनंतर स्थगित

पुढील आठवड्यात बैठक यासंदर्भात बैठक होणार असून सकारात्मक निर्णय घेणार

Updated: Mar 14, 2020, 08:39 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठा आंदोलन ४७ दिवसांनंतर स्थगित title=

मुंबई : आझाद मैदानावर सुरु असलेले मराठा आंदोलन तब्बल ४७ दिवसांनी स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत यासंदर्भातील दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलनाना स्थगिती देण्यात आली आहे. 

दरम्यान एकनाथ शिंदे, विजय वड्डेटीवार यांनी आझाद मैदानावर जाऊन  आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर ४७ दिवस सुरु असलेले हे आंदोलन मागे घेण्यात आले. पुढील आठवड्यात बैठक यासंदर्भात बैठक होणार असून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन यावेळी मराठा आंदोलकांना देण्यात आले आहे. 

सरकार  उमेदवारांच्या नियुक्त्या करत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा मराठा समाजातील तरुणांनी घेतला होता. तसेच मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवा, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.

दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात सगळेजण बैठका घेत आहेत. मराठा आंदोलकांच्या मागण्यांना कोणाचाच विरोध नाही तर मग निर्णय का घेतला जात नाही?, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला. सरकार काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार वागत आहे. ही बाब योग्य नाही. सरकारने आता युद्धपातळीवर निर्णय घ्यायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती.