प्रशांत परदेशी, झी मीडिया, बोराळा, नंदुरबार : दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले कमांडो मिलिंद खैरनार हे कमालीचे धाडसी आणि निर्भिड होते. एखाद्या गुप्तहेराप्रमाणे मिलिंद याचं व्यक्तिमत्व होतं. कुटुंब आणि मित्रांमध्ये राहणारे मिलिंद आणि आपल्या कर्तव्यावर हजर असलेले मिलिंद यांच्यात कमालीची तफावत होती.
मिलिंद किशोर खैरनार... कुटुंबात आणि मित्रपरिवारात अत्यंत साधं, सरळ आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व... मुंबईवरचा हल्ला असो की बांदिपोरामध्ये शौर्य गाजवणं असो... मिलिंद यांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी संघर्ष केला...देशासाठी लढणं किती महत्त्वाचं आणि सैन्यात भरती होण्यासाठी काय केलं पाहिजे याची माहिती ते नेहमी आपल्या मित्रपरिवाराला देत...
कुठल्याही मोठ्या मोहिमेला निघण्यापूर्वी मिलिंद आपल्या कुटुंबाला फक्त एक टेक्स्ट मेसेज टाकत. तोही मोहिमेला जात आहे या आशयाचा... मोहीम पूर्ण झाल्यावर पुन्हा मोहीम पूर्ण झाली असून आपण बेसवर परत आल्याचा मेसेज येत असे... परंतु, त्या दिवशी हा मॅसेज आलाच नाही... आली ती त्यांच्या शहीद झाल्याची बातमी...
मुंबईच्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी कमांडोच्या पथकात हेलिकॉप्टर मधून उतरणारे मिलिंद हे तिसऱ्या क्रमांकाचे कमांडो होते. कमांडो म्हणून मिलिंद यांचं कतृत्व अतुलनीय होतं. सैन्यात कमांडो म्हणून त्यांची कारकिर्द सदैव स्मरणात राहील. शहीद मिलिंद खैरनार यांना 'झी २४ तास'चा सलाम...