राज्यात डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक - चंद्रकांत पाटील

सरकार पडले तर डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक होऊ शकेल, असे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

Updated: Feb 5, 2020, 04:32 PM IST
राज्यात डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक - चंद्रकांत पाटील title=

मुंबई : सरकार पडले तर डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक होऊ शकेल, असे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपने विश्वासघात केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत. मात्र मध्यावधी निवडणूक झाली तर कोणी कोणाचा विश्वासघात केला हे समजेल, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेवरही त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. 

चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला जोरदार चिमटा काढला. विधानसभा निवडणुकीनंतर कोणी कोणाचा विश्वासघात केला, हे लोकांना माहिती आहे. हे सरकार चालले नाही तर भाजप सरकार पुन्हा सत्तास्थापनेचा दावा करणार नाही. अशावेळी मध्यावधी निवडणूक लागली तर कोणी विश्वासघात केला होता, याचे उत्तर जनताच देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का, याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षण खटल्यावरूनही मुख्यमंत्री ठाकरे सरकारचे कान टोचले. मराठा आरक्षणास स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला, याबद्दल त्यांचे आभार मानतो. मात्र, आजच्या सुनावणीवेळी राज्य सरकारने काहीच तयारी केली नव्हती. तेव्हा पुढील काळात राज्य सरकारने पूर्ण ताकदीने हा खटला लढवावा. यामध्ये राजकारण आणू नये, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिली.