मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

Updated: Mar 24, 2021, 07:35 AM IST
मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण  title=
संग्रहित छाया

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. गतवर्षी जून महिन्यात धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर मुंडे यांनी पुन्हा आपल्या कामास सुरूवात केली होती. तसेच राज्यात आता कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. यातच आता पुन्हा धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना झाल्याची माहिती मुंडे यांनी ट्विट करत दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे, माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे आणि स्वतःची काळजी घ्यावी”, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

 राज्यात काल 28,699 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे.  नवीन 13165 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2247495 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 230641 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.73 टक्के  झाले आहे.

दरम्यान, राज्यात काल दिवसभरात तब्बल 132 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चिंताजनक बाब सरकारी आकडेवारीवरून समोर आली आहे. त्यामुळे कोरोना पुन्हा एकदा राज्यात उग्र रुप धारण करत असल्याचे दिसून येत आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्क्यांपर्यंत वर गेला आहे. तर रिकव्हरी रेट तब्ल 88.73 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.