विरार लोकलचा भार कमी होणार? मेट्रो 9 लवकरच धावणार; अशी असतील स्थानके

Mumbai Metro 9:  दहिसरहून मिरा-भाईंदरला येणाऱ्या मेट्रो 9चा दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 12, 2024, 10:48 AM IST
 विरार लोकलचा भार कमी होणार? मेट्रो 9 लवकरच धावणार; अशी असतील स्थानके title=
mira bhayandar metro 9 one phase one likely to be operational by december 2024

Mumbai Metro 9:  प्रशासनाकडून मुंबईत मेट्रोचं जाळं पसरवण्यात येत आहे. लोकलला होणारी गर्दी आणि त्यातून होणारे अपघात हा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. लोकलला होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेकजण हल्ली मेट्रोचा आधार घेताना दिसतात. महामुंबईपर्यंत मेट्रोचे जाळे पसरवण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मेट्रो 3चा पहिला टप्पा काहीच दिवसांत प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. त्याचबरोबर, मेट्रो 9चा पहिला टप्पादेखील या वर्षाअखेर प्रवाशांच्या सेवेत येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

दहिसरहून मिरा भाईंदरला जोडणाऱ्या मेट्रो 9चा पहिला टप्पा या डिसेंबरअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. दहिसर ते काशीगाव असा पहिला टप्पा असणार आहे. तर, काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान हा दुसरा टप्पा पुढील वर्षी डिसेंबरला खुला होण्याची शक्यता आहे. 2009मध्ये या मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली होती. मेट्रोचे काम लवकर पूर्ण करुन सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सध्या या मेट्रोचे काम 87 टक्के इतके झाले आहे. तर, दोन टप्प्यात ही मेट्रो सुरू होणार आहे. 

मेट्रो 9चा पहिला टप्पा दहिसर ते काशिमीरा या दरम्यान सुरू करण्यात येणार आहे. डिसेंबर 2024 पर्यंत ही मेट्रो धावणार आहे. या मेट्रोमुळं नागरिकांचा प्रवास सुसज्य आणि जलद होणार आहे. तसंच, नागरिकांना थेट गुंदवली-अंधेरी ते मिरा भाईंदरमधील काशिमीरा दरम्यानचा प्रवास जलद करता येणार आहे. मीरा-भाईंदर शहर मुंबईला जोडण्यासह येथील प्रवाशांचा प्रवास सोप्पा व्हावा, असा शासनाचा प्रयत्न आहे. तसंच, या मेट्रोमुळं दहिसर नाक्यावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. 

कशी आहे ही मेट्रो मार्गिका

मेट्रो 9 ही मुंबई उपनगर आणि मीरा भाईंदरला जोडण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 10.08 किमीचा ही मार्गिका असून यात 8 स्थानकांचा समावेश असणार आहे. पहिले स्थानक हे दहिसर आहे. पहिल्या टप्प्यात चार स्थानकांचा समावेश आहे. दहिसर, पांडुरंग वाडी, मीरागाव आणि काशीगाव. तर,  दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो सेवा पुढील वर्षी सुरू करण्यात येणार आहे. 

विरार-वसई येथून लोकल भरून येतात. अनेकदा मिरा-भाईंदरच्या प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यास मिळत नाही. तसंच, भाईंदरवरुन सुटणाऱ्या लोकलच्या फेऱ्या मर्यादित आहेत. त्यामुळं मीरा-भाईंदर प्रवाशांनी मेट्रोचा विस्तार भाईंदरपर्यंत करावा, अशी मागणी केली होती. तेव्हा तत्तालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली होती. 2019मध्ये मेट्रोच्या कामास सुरुवात झाली होती. मेट्रो सुरू झाल्यानंतर आता प्रवाशांना लोकलच्या गर्दीपासून थोडी सुटका मिळणार आहे. तसंच, विरार लोकलचा गर्दीचा भारही हलका होण्यास मदत मिळणार आहे.