पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातींचं राजकारण वाढलं असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना खोचक सल्ला दिला होता. 'राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचावेत', असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. यावर आता राज ठाकरे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरे पाचव्यांदा पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं.
'मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत, मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावं' असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 'वैचारिकदृष्ट्या जोपर्यंत प्रगत होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी आल्या, तरी आपली प्रगती होणार नाही. आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत झालो का? या अनुषंगाने माझी भूमिका होती', असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 1999 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं सांगत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीमुळे जातीयवाद वाढल्याचा पुनरुच्चार केला.आरक्षण जातीच्या आधारवर नव्हे तर केवळ स्त्री-पुरूषाच्या आधारावर आरक्षण देण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली आहे. मराठा आरक्षण देता येत नसेल तर स्पष्ट सांगा. केवळ तरुणांची माथी भडकवू नका अशी टीका राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे.
आपण बाबासाहेब पुरंदरेंना भेटतो. ते शिवशाहीर म्हणून भेटतो. ब्राह्मण म्हणून भेटत नाही. शरद पवारांना भेटतो तेव्हा मराठा म्हणून भेटत नाही. तुम्हाला भेटतो तेव्हा तुमची जात पाहून भेटत नाही. आपण यातून बाहेर पडलं पाहिजे, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी मला कुणी मोजण्याचं काम करू नका, असं ठणकावलं.
नरेंद्र मोदी हे विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान झाले, जात-धर्माच्या आधारे नाही. लोक विकासाच्या मुद्द्यावरही मतदान करतात हे दिसलं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.