'कितीही आवडता पक्ष असो किंवा..' जातीपातीच्या राजकारणावरुन राज ठाकरेंचा 'महाराष्ट्रा'ला सल्ला

MNS Chief Raj Thackeray On Caste Politics: महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या जातीपातीविषयक राजकारणासंदर्भात राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 24, 2024, 01:17 PM IST
'कितीही आवडता पक्ष असो किंवा..' जातीपातीच्या राजकारणावरुन राज ठाकरेंचा 'महाराष्ट्रा'ला सल्ला title=
मुंबईत बोलताना नोंदवली प्रतिक्रिया

MNS Chief Raj Thackeray On Caste Politics: राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये यासाठी आंदोलन करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके मागील काही दिवसांपासून सातत्याने एकेमेकांविरोधातील दावे-प्रतिदावे करत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश-बिहारसारखी परिस्थिती निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली आहे. 

मनसेची पक्षांतर्गत बैठक झाली

मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलातना राज ठाकरेंना बैठकीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना त्यांनी, "पक्षांतर्गत बैठक होती. निवडणुकाच्या दृष्टीकोनातूनच आजची आमची पक्षाची अंतर्गत बैठक होती. त्यांना काही कार्यक्रम उपक्रम दिले आहेत. त्यानुसार ते मला येतील आणि भेटतील आणि माझ्याशी बोलतील," असं सांगितलं. यानंतर राज ठाकरेंना राज्यातील सध्य परिस्थितीवरुन प्रश्न विचारण्यात आला. 

जातीपातीमधून काही होणार नाही

"राज्यात ज्यापद्धतीने राजकीय तेढ वाढतोय त्याकडे कसं पाहात? राज्यकर्त्यांकडून एका समाजाला आश्वासन दिल्यानंतर दुसरा समाज नाराज होत आहे," असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर राज ठाकरेंनी, "मला वाटतं या सर्व सामाजांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की या जातीपातीमधून काही होणार नाही. मी इतकी वर्ष माझ्या भाषणांमध्ये, मुलाखतींमध्ये हे बोललो आहे. हे सर्व पुढारी जातीपातींमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं हातात घेतात. भोलचटपणे हे मतं देतील देखील," असं राज ठाकरे म्हणाले.

नक्की वाचा >> मुंबईतील 50% नवी घरं मराठी माणसांसाठी राखीव? नियम मोडणाऱ्या बिल्डरला 10 लाखांचा दंड?

अशा लोकांना महाराष्ट्राने दूर ठेवलं पाहिजे

"मला काल कोणीतरी क्लिप दाखवली ज्यात लहान लहान मुलं जातीबद्दल बोलत आहेत. हे कधी बोललो होतो मी की हे (जातीपातीचं) प्रकरण शाळा-कॉलेजांपर्यंत जाणार. हे विष कधी महाराष्ट्रामध्ये नव्हतं. जातीपातीमध्ये विष कालवणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने दूर ठेवलं पाहिजे," असं राज ठाकरे म्हणाले.

पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं?

तसेच पुढे बोलताना राज ठाकरेंनी, "कितीही आवडता पक्ष असो किंवा व्यक्ती असो हे असलं विष कालवणार असतील तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं? काय होणार महाराष्ट्राचं? मी नेहमी सांगत आलो, उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या गोष्टी सुरु आहेत तसं महाराष्ट्रात सुरु होईल. यावरुन खूनखराबे सुरु होतील," अशी भीती देखील बोलून दाखवली.