औरंगाबाद : औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ठाकरी तोफ आज धडाडणार आहे. राज गर्जनेची तयारी जोरदार करण्यात आली आहे. भोंग्यांवरून सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर राज ठाकरेंच्या आजच्या सभेकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय. आज राज ठाकरे कुणाला टार्गेट करणार...? आजच्या सभेत काय बोलणार. याचीच उत्सुकता मनसे (MNS) कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही आहे.
राज ठाकरेंच्या सभेला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी 3 हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. तर सभेच्या प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. आजची सभा ऐतिहासीक होईल असा दावा मनसे नेत्यांनी केला आहे.
औरंगाबाद 'फत्ते' करण्यासाठी राज ठाकरेंची 'शिकस्त'
औरंगाबादच्या हायव्होल्टेज जाहीर सभेसाठी निघताना पुण्यात राज ठाकरेंसाठा अभिषेक करण्यात आला. हिंदूजननायक ही राज ठाकरेंची नवी प्रतिमा जनमानसावर बिंबवण्यासाठी मनसेनं जोर लावला आहे.
औरंगाबादचं संभाजीनगर असं अधिकृत नामांतर होईल तेव्हा होईल. पण औरंगाबादच्या सभेआधी राज ठाकरेंनी दाखवलेला ट्रेलर पुढचा पिक्चर नेमका काय असेल, याची झलक दाखवणारा आहे.
विद्यापीठ नामांतर चळवळीनंतर मराठवाड्यात सामाजिक दुही निर्माण झाली. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत प्रत्येक राजकीय पक्षानं केला. मराठवाड्याच्या याच जातीय ध्रुवीकरणाच्या राजकारणात आता राज ठाकरेंनी शड्डू ठोकलाय. मराठवाडा काबीज करण्यात ते किती प्रभावी ठरतात, हे पाहणं लक्षणीय ठरेल.