देखो वो आ गया! अखेर मान्सून राज्यात दाखल

पुढील काही दिवस मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक 

Updated: Jun 11, 2020, 02:52 PM IST
देखो वो आ गया! अखेर मान्सून राज्यात दाखल
संग्रहित छायाचित्र

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये दमदार सुरुवात करत सूर्याच्या दाहापासून सर्वांनाच एक सुखावह अनुभव देणारा मान्सून आता देशभरात त्याचा प्रवास सुरु करत आहे. सध्याच्या घडीला हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. 

अखेर बहुप्रतिक्षित मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. सोलापूरच्या काही भागातही मान्सून धडकला आहे. शिवाय ठाणे आणि कोकणातही अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असल्यामुळं राज्यातील बहुतांश भागांमध्ये वरुणराजा दिमाखात हजेरी लावणार हे स्पष्ट होत आहे. 

 

पुढच्या ४८ तासांत मान्सून राज्यात आणखी पुढे सरकणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता खऱ्या अर्थानं बळीराजा आणि राज्यातील जनता मान्सूनच्या आगमनामुळं सुखावणार असंच म्हणावं लागेल. 

लांबलेला मान्सून अखेर आलाच... 

निसर्ग चक्रीवादळामुळं मान्सून साधारण आठ दिवसांनी लांबला होता. पण, आता मात्र त्याच्या प्रवासातील अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळं बंगालच्या उपसागरातील अतिशय अनुकूल अशा वातावरणात त्याचा प्रवास तामिळनाडून, पश्चिम आणि मध्य बंगाल, मिझोरम रोखानं सुरु झाला. कमी दाबाच्या या पट्ट्यांमुळं महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिशामध्येही मान्सूनपूरक वातावरण पाहायला मिळत आहे. ज्या धर्तीवर आता पुढील दोन दिवसांत बहुतांश भागांमध्ये मुसळधार पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.