पुणे : महापुरामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातून दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातल्या ९७ हजार तर सांगली जिल्ह्यातल्या ८० हजार लोकांचा समावेश आहे. तर या महापुरात एकूण २७ जणांचा बळी गेल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यातल्या ब्रह्मनाळ गावात बचावकार्य करणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचे मृतदेह सापडलेत. तर ३ जण अजूनही बेपत्ता आहेत. गावकऱ्यांनी सुरु केलेल्या बचावकार्याला दुर्घटनेचं गालबोट लागल्यानं गावावर शोककळा पसरली आहे.
महापुराने कोल्हापूरचा भूगोलच बदलून टाकलाय. शिरोळ तालुक्यात नदी आणि आसपासच्या शेतीचे रूपांतर समुद्रात झाले आहे. नजर जाईपर्यंत पाणीच पाणी दिसतं आहे.
सांगलीच्या जिल्हा कारागृहातही पुराचं पाणी शिरलंय. जेल प्रशासनाला बाहेरुन मदत मिळत नसल्यानं कारागृह प्रशासन हतबल आहे. त्यात दोन कैद्यांनी कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
महापुरामुळं कोल्हापूर आणि सांगलीतली परिस्थिती हाताबाहेर गेलीय. चार चार दिवस लोकांना अन्न-पाण्याशिवाय भीषण परिस्थितीत दिवस कंठावे लागतायत. अशा स्थितीत पीडितांना मदत करायची सोडून मंत्री भलत्याच कामात अडकलेत. तर अधिकारी सुस्त आहेत.