देवाक् काळजी! जादा गाड्या, आरक्षित तिकिटांचं काय? एसटी कामगारांच्या आंदोलनामुळं प्रवासी बुचकळ्यात

MSRTC ST Bus Epmloyees Strike : गाव गाठायचाय पण, हे कसं शक्यंय? एसटी कर्मचाऱ्यांच्या आमदोलनामुळं प्रवाशांपुढे अडचणींचा डोंगर. आता पुढे काय? पाहा सर्वात मोठी अपडेट  

सायली पाटील | Updated: Sep 4, 2024, 08:20 AM IST
देवाक् काळजी! जादा गाड्या, आरक्षित तिकिटांचं काय? एसटी कामगारांच्या आंदोलनामुळं प्रवासी बुचकळ्यात title=
MSRTC ST Bus Epmloyees Strike Konkan tourists impacted before ganeshotsav

MSRTC ST Bus Epmloyees Strike : गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांच्या गरजा लक्षात घेत एसटी महामंडळाकडून दरवर्षीप्रमाणं यंदाही जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवाशांनाहीही दमदार प्रतिसाद देत एसटी बसच्या तिकिटांचं आरक्षण केलं. पण, आता मात्र हेच प्रवासी आरक्षण तिकीटापासून अगदी त्यांच्या जादा गाड्यांच्या वेळा आणि त्या गाड्यांच्या प्रवासाबद्दल साशंक दिसत आहेत. कारण ठरतंय ते म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. 

जादा गाड्यांचं काय? 

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज (बुधवारी) दुसरा दिवस. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केल्यामुळं कोकणात गणपतीसाठी निघालेल्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. काही गावांमध्ये एकही एसटी डेपोतून बाहेर निघत नसल्याने गावकरी, विद्यार्थ्यांचेही हाल होतायत. दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत कामगार संघटनेची
बैठकच आता या आंदोलनावर तोडगा काढणार आहे. तूर्तास एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून,  दीर्घ काळासाठी करार पद्धतीने चालक आणि इतर आवश्यक कर्मचारी नेमण्यासाठी एसटी प्रशासन चाचपणी करत असल्याची माहिती मिळत आहे. 

हेसुद्धा वाचा : गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीच्या चाकांना ब्रेक, कर्मचाऱ्यांनी उपसलं संपाचं हत्यार...काय आहेत मागण्या?

 

एसटी महामंडळाच्या गणपती विशेष जादा गाड्यांमध्ये 4200 एकत्रित आरक्षण आणि 700 हून अधिक वैयक्तिक आरक्षण असून, 4,5 आणि 6 सप्टेंबरला गाड्या मोठ्या प्रमाणात कोकणाच्या दिशेनं निघणार आहेत. पण, प्रत्यक्षात मात्र कामगारांच्या आंदोलनामुळं आता चाकरमान्यांचे हाल होत असल्याचच चित्र समोर येत आहे. मुंबई सेंट्रल आणि तत्सम आगारांतूनही एसटी बस निघण्यात दिरंगाई, तर काही आगारांमधून एकही एसटी निघत नसल्यामुळं तिथं प्रवाशांची गर्दी ओढावण्यास सुरुवात झाली आहे. 

विशेष एसटी बसची संख्या मोठी 

बुधवार  गुरुवार शुक्रवार
मुंबई - 337 मुंबई - 1365 मुंबई - 110
ठाणे - 472 ठाणे - 1881 ठाणे - 96
पालघर - 187 पालघर - 372  पालघर - 70

कोट्यवधींचं नुकसान 

राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका एसटीच्या महसुलावर झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे एसटीचा दिवसभरात अंदाजे 14 ते 15 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.