मेघा कुचिक / मुंबई : kalyan shiv sena political appearance scene : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट यांच्या वादातील पडसात गणेशोत्सवात उमटताना दिसत आहेत. गणेशोत्सवात आपलीच खरी शिवसेना आहे याचा हरतऱ्हेने दोनहीकडून दावा केला जात आहे. एवढंच नव्हे तर काही ठिकाणी गणपतीची सजावट या राजकीय घडामोडींवर आधारित करण्यात आली आहे. कल्याणमध्ये शिवसेना नेते विजय साळवी सदस्य असलेल्या विजय तरुण मंडळाने '50 खोके एकदम ओके' यावर आधारित चालता-बोलता देखावा साकारला आहे. या देखाव्याला पोलिसांनी नोटीस बजावली होती. आता हा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला होता.
मुंबई हायकोर्टाने विशेष सुनावणीत कल्याणमधील गणेश मंडळाला पोलिसांनी बजावलेल्या नोटिसीविरोधात दाखल केलेली याचिका निकाली काढली आहे. ज्यात अलीकडच्या घटनेच्या थीमवर आधारित पंडालमध्ये वाजवलेल्या काही दृकश्राव्य क्लिप काढून टाकण्याचे निर्देश दिले. म्हणजेच50 खोके एकदम ओके असे चित्रण असलेली क्लिप वगळून इतर देखावा कायम ठेवण्याचे निर्देश नन्यायालयाने दिले आहेत. क्लिपचे आक्षेपार्ह भाग मंडळाने बदलले आहेत आणि ते सर्वांना मान्य असल्याचे हायकोर्टाने नमूद केले आहे. कोर्टने पंडालमध्ये सुधारित ऑडिओ ट्रान्सक्रिप्ट आणि व्हिज्युअल क्लिप प्ले करण्यास परवानगी दिली आहे.
पोलिस कर्मचार्यांनी 31 ऑगस्ट रोजी पंडालमध्ये लावलेला सजावटीचा सेट काढून टाकला होता आणि साळवी आणि इतरांविरुद्ध कलम 153 (इच्छेने दंगल घडवण्यासाठी चिथावणी देणे) आणि 505 (2) (शत्रुत्वाला प्रोत्साहन देणारी विधाने) अंतर्गत दंडनीय गुन्ह्यासाठी गुन्हा दाखल केला होता. या देखाव्यात शिवसेनेला मोठा वृक्ष दाखवण्यात आला आहे. या वृक्षाला फळे लागल्यानंतर ती इतर पक्ष खातात अशा आशयाचा हा देखावा होता. मात्र याला कल्याण पोलिसांनी आक्षेप घेतला असून या देखाव्यावर पहाटेच्या सुमारास कारवाई करत देखाव्याची सामग्री जप्त केली.
दरम्यान, या कारवाईबाबत विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी सांगितले की, मंडळतर्फे प्रत्येक वर्षी वर्षातील महत्वाच्या घडामोडीवर देखावा साकारला जातो. यंदाच्या देखाव्यात काहीच आक्षेपार्ह नव्हत ,पहाटेच्या सुमारास कारवाई केली, ही हिटलरशही आहे.