Mumbai Crime News: मीरा-भाईंदर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 8 वर्षांच्या एका मुलाने अनाथाश्रमाच्या परिसरात असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. हा मुलगा मानसिकरित्या अस्थिर असल्याचे बोलले जात आहे. मुलाच्या आईने दुसरं लग्न केल्यामुळं त्याला अनाथाश्रमात सोडलं होतं. त्यावरुन तो तणावात होता, अशी माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनाथाश्रमात राहणाऱ्या मुलाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. मंगळवारी सकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. मुलगा गेल्या कित्येक महिन्यापासून मीरा-भाईंदर येथे असलेल्या केअरिंग हँड्स सेवा कुटीर अनाश्रमात राहत होता.
सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जेव्हा अनाथाश्रमातील सर्व मुलं झोपायला गेले तेव्हा तोदेखील त्यांच्यासोबत गेला होता. मंगळवारी सकाळी जेव्हा मुलांची हजेरी घेतली तेव्हा एक मुलगा बेपत्ता होता. तेव्हा अनाथाश्रमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा अंगणात असलेल्या विहिरीत मुलाचा मृतदेह सापडला.
उत्तन पोलिस ठाण्याचे पीएसआय लक्ष्मण बडादे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 8 महिन्याआधी मुलाच्या आईने त्याला अनाथाश्रमात सोडलं होतं. मुलाच्या वडिलांचा मृत्यूनंतर त्याच्या आईने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले होते. ती त्याच्यासोबतच राहात होती. मात्र, आर्थिक स्थिती बेताची असल्याने तिने मुलाला अनाथाश्रमात सोडलं होतं. मात्र, त्याला सतत आईची आठवण येत राहायची. त्यातूनच त्याने हे पाऊल उचललं असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षांचा मुलगा मानसिक तणावात होता. त्याला सतत आईची आठवण येत होती. काही दिवसांपूर्वी त्याची आई त्याला भेटण्यासाठी आली होती. तेव्हा त्याने आईला म्हटलं होती की मला इथे नाही राहचंय. मात्र आईने त्याला समजावून तिथेच राहण्यास सांगितले. त्याला आईसोबत राहायचं होतं मात्र आईला त्याला सोबत घेऊन जायचं नव्हतं. त्याच तणावातून त्याने आत्महत्यासारखे पाऊल उचलले, असं समोर येत आहे.