प्रशांत अंकुशराव, झी 24 तास, मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईसाठी आता पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. रस्त्यावर नियमबाह्यपणे गाडी चालवणाऱ्यांना चाप बसण्यासाठी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे, तसेच बेशिस्त वाहन धारकांनाही चाप बसणार आहे. (Mumbai Traffic police will take strict action against unruly drivers)
मुंबईत वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. पावसाळयात ही समस्या आणखीण जटील बनते. तसेच विरूद्ध दिशेन गाडी चालवणाऱ्या वाहन धारकांमुळेही अपघाताच्या घटना घडतात. या सर्व घटना रोखण्यासाठी आता पोलिसांनी कडक कारवाईला सुरवात केली आहे.
खटारा वाहने हटवली
मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कडेला खटारी वाहने उभी असतात. या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होती. या खटारा वाहनांना आता रस्त्यावरून हटवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता मुंबईच्या रस्त्यावरून तब्बल १४ हजार ३५३ खटारा वाहने हटवण्यात आली आहेत.
बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई
मुंबईत विरुद्ध दिशेने वाहन चालवणारे अनेक वाहनधारक आहेत. या वाहन धारकांमुळे अपघाताच्या घटना घडत असतात. त्यामुळे अशा तब्बल 22 हजार 828 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या वाहन चालकांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक नवनवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. रिमूव्ह खटारा,विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांना चाप, विनाकारण हॉर्न वाजवण्यांना पायबंद घालण्यासारख्या मोहीमांचा यात समावेश आहे.
पोलिस आयुक्तांच्या या आदेशाने मुंबईच्या वाहतुकीला शिस्त लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.