मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या

मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या करण्यात आली आहे.

Updated: Oct 29, 2020, 07:55 AM IST
मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या  title=

ठाणे : मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या करण्यात आली. ते संध्याकाळी  रिलायन्स रेसिडेन्सी भागातील पटेल आर मार्टजवळ उभे होते. चार हल्लेखोरांनी त्यांना खाली पाडत तीक्ष्ण हत्याराने वार केले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चार संशयितांना जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात मोठी नावे बाहेर येण्याची शक्यता आहे.

राकेश पाटील हे संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान रिलायन्स रेसिडेन्सी भागातील पटेल आर मार्टजवळ उभे असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना खाली पाडत त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. यामध्ये पोटात आणि मानेवर वर्मी घाव बसल्याने राकेश गंभीर जखमी झाले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने आधी उल्हासनगरच्या एका खासगी रुग्णालयात नेले. तिथून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

या घटनेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोर्टीस हॉस्पिटलबाहेर धाव घेतली. तर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू करत आरोपींचा शोध सुरू केला. राकेश पाटील यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी दोन गाड्यांमधून पळून गेले. त्यापैकी ते एक गाडी अंबरनाथमार्गे मुरबाडच्या दिशेने गेली. या दरम्यान मुरबाड पोलिसांनी रायता परिसरात नाकाबंदी केली आणि काही वेळातच आरोपी पळून जात असलेली गाडी पोलिसांनी पकडली. 

या गाडीतून चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली गाडी अंबरनाथमधील एका गावगुंडाच्या नावावर असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. हा गुंड अंबरनाथ शहरातील एका नामांकित बिल्डरसाठी काम करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मोठी नावे येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.