...म्हणून महाविकास आघाडीचे सरकार गेले; शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर फोडलं खापर

Sharad Pawar Book: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. या पुस्तकातून शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणाबाबत अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. 

आकाश नेटके | Updated: May 3, 2023, 10:30 AM IST
...म्हणून महाविकास आघाडीचे सरकार गेले; शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर फोडलं खापर title=

Sharad Pawar Book Publication: गेली पाच दशके राज्यसह देशाच्या राजकारणात आपलं महत्त्वाचे स्थान निर्माण करणाऱ्या राष्ट्रावादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या (Lok Maze Sangati) आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित होत आहे. मात्र त्याआधीच या आत्मचरित्राचा काही महत्त्वाचा भाग समोर आला आहे. सध्याच्या राज्याच्या राजकारणातल्या महत्त्वाच्या घडामोडींबाबत शरद पवार यांनी या आत्मचरित्रात आपलं मत व्यक्त केले आहे. 2019 साली उदयास आलेल्या महाविकास आघाडीबाबतही शरद पवार यांनी या आत्मचरित्रात भाष्य केले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. पण त्यामागाचे राजकारण नेमकं काय होतं याबाबत शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केले आहे. 

शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे हे सत्तेतून पायउतार झाले होते. याबाबतही शरद पवार यांनी लोक माझे सांगातीच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये भाष्य केले आहे. संघर्ष न करता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला असा दावा शरद पवार यांनी केला आहे. तसेच भाजप आणि शिवसेनेतील वाढलेलं अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होता, असा दावा शरद पवार यांनी या आत्मचरित्रातून केला आहे.

उद्धव ठाकरे शिवसेनेतील वादळ शमवायला कमी पडले...

"महाविकास आघाडीचं सरकार हा फक्त सत्तेचा खेळ नव्हता. अन्य पक्षांना दडपून टाकत, लोकशाहीतल्या इतर पक्षांचं महत्त्व येनकेन प्रकारेण संपवत राजकीय वर्चस्व निर्माण करण्याच्या भाजपाच्या वृत्तीला हे सडेतोड उत्तर होतं. महाविकास आघाडीचं सरकार हे भाजपाला देशभरात मिळालेले सर्वात मोठं आव्हान होतं. हे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होणार, याची कल्पना होतीच. आम्ही आमच्या पातळीवर असे डावपेच हाताळायला भक्कम होतो. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत वादळ माजेल याचा मात्र आम्हाला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडलं. संघर्ष न करता उद्धवनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला. राजकारणातल्या अतर्क्यतेचा आणखी एक अनुभव गाठीशी जमा झाला," असे शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे.

भाजपला राजकीय वर्चस्वासाठी शिवसेनेचं उच्चाटन करायचं होतं

"राज्याच्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वी शिवेसना 171 आणि भाजप 117 जागा लढत असे. पण 2019नंतर चित्रं बदललं. 2019मध्ये शिवसेनेने 124 जागा लढल्या. तर भाजपने 164 जागा पदरात पाडून घेतल्या. स्वत: च्या बळावर बहुमत मिळवत शिवसेनेचं ओझं उतरवून ठेवायचं असा चंग अतिआत्मविश्वासात दंग भाजपने बाळगला होता. नारायण राणे हे शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार. पण भाजपमध्ये विलीन करून घेत सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं. राज्यातील 50 मतदारसंघात बंडखोरांचं आव्हान होतं. त्यातील बहुतेकांनी ठोकलेले दंड नेत्यांच्या आशीर्वादने आणि पक्षाच्या बळावर होते. शिवसेनेची ताकद असलेल्या शहरी भागात तिचं उच्चाटन केल्याशिवाय आपल्याला राज्यात वर्चस्व स्थापन करण्यात येणार नाही असा सरळ राजकीय हिशोब भाजपचा होता. याचमुळे आपल्या राजकीय अस्तित्वावर भाजप उठला आहे, या विषयी शिवसेना नेतृत्व आणि त्यांच्या कार्यकर्त्यात तीव्र संताप होता. सत्तेत एकत्र असल्याने त्याचा उद्रेक झाला नाही. पण आग धुमसत होती," असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.