जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : सफाई कर्मचाऱ्यांना कामाची शिस्त लागावी म्हणून नागपूर महापालिकेने गेल्या वर्षी प्रायोगिक तत्वावर जीपीएस युक्त घड्याळ दिले होते. सफाई कर्मचाऱ्या नंतर आता हे जीपीएस घड्याळ महापालिकेतील अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. याची सुरवात खुद्द नागपूर महापालिका आयुक्तांनी स्वतःपासून केली आहे. नागपूर महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी महापालिकेतील उपायुक्त,सहायक आयुक्तांपासून ते सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना हे घड्याळ दिलंय. केवळ अधिकाऱ्यांनाच घड्याळ देण्यावर ते थांबले नाही तर स्वतः देखील हे घड्याळ वापरण्यास त्यांनी सुरवात केली.
अनेक कर्मचारी आणि अधिकारी वेळेवर हजर राहत नाहीत. पूर्वसूचना न देता गैरहजर राहतात. तर काही निर्धारित वेळेपूर्वीच निघून जातात. अशा प्रकारच्या तक्रारी सामन्य नागरिकांच्या असतात. यावर उपाय म्हणून नागपूर महापालिका आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना एक जीपीएस युक्त घड्याळ उपलब्ध करून दिलंय.
कर्मचाऱ्यांना देण्यात आलेलं हे घड्याळ तितकंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे घड्याळ जीपीएस युक्त, कॅमेरायुक्त, फोटो अपलोडिंग ची सुविधा, SOS मेसेज ची सुविधा, जिओ फेन्सिंग सुविधा, टूवे कम्युनिकेशन, वॉटर प्रुफ, एकदा चार्ज केल्यावर २ दिवस सुरु राहते, यंत्रणा महापालिकेच्या कंट्रोल सिस्टमशी जोडलेली आहे.
अधिकाऱ्यांना जीपीएस युक्त घड्याळ देऊन अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे आणि महापालिकेचे काम उत्तम व्हावे या दृष्टीने उचलेले हे पाउल असल्याचे नगरसेवक देखील सांगतात. जीपीएस घडयाळामुळे एक पाउल पुढे जाऊन केवळ मनगटावर घड्याळ बांधल्यास कर्मचाऱ्याच्या हजेरीची नोंद होणार आहे. एवढेच नाही तर दिवसभरात कर्मचारी कुठे गेला हेदेखील कळणार आहे. म्हणजेच कर्मचारी किती वेळ क्षेत्रात कामावर होता याची नोंद होणार आहे. या सर्व कामासोबत हे घड्याळ एक महत्वाचे काम करते आणि ते म्हणजे वेळ देखील दाखवते.