पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : वडिलांसोबत मुलीचं नातं जरा वेगळंच असतं जेवढं जीवापाड प्रेम एक मुलगी करते तेवढं मुलगा वडिलांवर करत नाही असं म्हंटल जातं. पण नागपुरात (Nagpur) असं काही भयानक घडल की त्यावर तुंमचा विश्वासच बसणार नाही. मुलीनेच जन्मदात्या बापाच्या हत्येचा कट रचला. यासाठी तिघांना तीने पाच लाखांची सुपारी दिली. त्या सराईत गुन्हेगारांनी अवघ्या 19 सेकंदात 29 वार करत तिच्या वडिलांची निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना नागपूर जिल्ह्यातील भिवापूर इथं घडली. तब्बल सात दिवसांनी या हत्येमागे पोटची मुलगीच असल्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय.
सीसीटीव्हीत हत्येचा थरार कैद....
नागपूरात भिवापूर (Bhiwapur) इथं 17 मे रोजी सकाळी 9 वाजून 54 मिनिटांनी भिवापूर इथले पेट्रोपंप मालक (Petrol Pump Owner) 60 वर्षीय दिलीप सोनटक्के नियमितपणे दोन कर्मचाऱ्यांसोबत ऑफिसमध्ये हिशोब करत बसले होते. त्याचवेळी दुचाकीवरुन तीन जण पेट्रोलपंपवर आले. काही कळायच्या आतच तिघांनी चाकूने दिलीप सोनटक्के यांच्यावर सपासप वार केले आणि तिथून फरार झाले. जाता जाता पेट्रोलपंपवरचे 1 लाख 38 हजार घेऊन पोबारा केला. पेट्रोलपंपवरील कर्मचारी हा थरार पाहून घाबरले, याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली. सुरवातीला दरोडा टाकण्याच्या उद्देशाने पेट्रोलपंप मालकाची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनाही वाटलं. पण तपासचा या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं.
हत्या करणारे तोंड उघडेना....
पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले यातील दोघांची ओळख पटली. पोलिसांनी दोघाना घटनेनंतर काही तासातच ताब्यात घेतलं. खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. यासोबतच तिसऱ्याच शोध सुरू होता. पण काही केल्या सराईत गुन्हेगार असलेल्या आरोपींनी आपलं तोंड उघडलं नाही. दुसरीकडे वडिलांची हत्या होऊन सुद्धा त्यांची पत्नी किंवा मुलं वाडीलांचा मारेकरी कोण आहे? याची साधी विचारपूस करायलाही आले नाहीत. त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई सोनट्क्के यांच्या कुटुंबीयांकडे वळली...
हत्येमागे हे होत कारणं....
मृतक दिलीप सोनटक्के याचं वय 60 वर्ष असून पत्नी आणि मोठी मुलगी आणि मुलगा असं कुटुंब आहे. गेल्या वर्षभरापासून दिलीप सोनटक्के हे कुटुंबियांना त्रास देत होते. काही महिन्यांपूर्वी हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला होता. त्यानंतर त्यांनी घर सोडलं. दिलीप सोनटक्के यांचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध होते आणि वर्षभरापासून ते तिच्याबरोबर दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहात होते. दिलीप सोनटक्के यांची संपत्ती आपल्या हातातून जाईल अशी त्यांच्या कुटुंबियांना भीती होती. तसंच विवाहबाह्य संबंधांचाही राग त्यांच्या मनात होता. यातूनच दिलीप सोनटक्के यांच्या मोठ्या मुलीने वडिलांच्या हत्येची पाच लाख रुपयांची सुपारी दिली.
असा झाला हत्येचा कटाचा उलगडा....
दिलीप सोनटक्के यांची मोठी मुलगी ही विवाहित असून ती दिव्यांग आहे. सुरवातीला पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली. पण हाती काहीच लागले नाही. त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलीस दलातील परिक्षाविधीन आयपीएस अनिल मस्के तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस ओमप्रकाश कोकाटे यांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर मुलीला बोलतं केलें. शेवटी तीने वडिलांच्या हत्येची कबुली दिली. दिलीप सोनटक्के यांची मोठी मुलगी प्रिया हिला मुख्य सूत्रधार म्हणून अटक केली आहे तर हत्येची सुपारी घेतलेल्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.