हेडलाईटच्या वादावरून एसआरपीएफ जवानाने कानाखाली मारली; शेजाऱ्याचा मृत्यू

Nagour Crime : राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने एका व्यक्तीला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार नागपुरात घडला आहे. दोन दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी त्याचा मृत्यू झाला.

आकाश नेटके | Updated: Sep 25, 2023, 10:31 AM IST
हेडलाईटच्या वादावरून एसआरपीएफ जवानाने कानाखाली मारली; शेजाऱ्याचा मृत्यू title=
(प्रातिनिधीक छायाचित्र - PTI)

Nagpur Crime : गाडीच्या हेडलाईटचा  प्रकाश डोळ्यांवर पडल्यातून झालेल्या किरकोळ वादातून राज्य राखीव पोलीस दलाच्या एका जवानाने (SRPF) एका व्यक्तीला कानाखाली मारली होती. जवानाच्या या मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आता उपचारादरम्यान त्या व्यक्तीची प्राणज्योत मालवली आहे. या घटनेनं नागपुरात (Nagpur Crime) खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) सीआरपीएफ जवानावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मृत झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अखेर त्याचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी रात्री वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत माता मंदिर परिसरात ही घटना घडली. मुरलीधर रामराव नेवारे (54, रा. वाठोडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपी निखिल गुप्ता (30) हा राज्य राखीव पोलीस दलात जवान आहे. मुरलीधर हे एका खाजगी संस्थेत कामाला होते. तर आरोपी निखिलची बहीण मुरलीधर यांच्या शेजारी राहते. गुरुवारी रात्री 9.30 सुमारास मुरलीधर नेवारे हे घरासमोर उभे होते. त्याचवेळी, निखिल त्याची कार घेऊन बहिणीला भेटण्यासाठी आला. घरासमोर कार पार्क करत असताना गाडीचा प्रकाश मुरलीधर यांच्या डोळ्यात पडला. त्यांनी निखिलला लाईट बंद करायला सांगितले.

याच्यावरुनच दोघांमध्ये तुफान वाद सुरू झाला. निखिलला याचा भयंकर राग आला आणि त्याने मुरलीधर यांच्या जोरात कानाखाली चापट मारली. यामुळे मुरलीधर बेशुद्ध पडले. काही वेळाने त्यांना शुद्धी आली. त्यावेळी मुलगा ओंकारने त्यांना घरी नेऊन झोपवले. मात्र दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी मुरलीधर हे उठलेच नाहीत. ओंकारने त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी सकाळी 11 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर ओंकारने पोलिस ठाण्यात निखिलविरोधात तक्रार दाखल करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी निखिलविरुद्ध कलम 304 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तो फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधात आहे.