जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : गो एअर या खाजगी विमान कंपनीत काम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. मंथन चव्हाण असे या तरुणाचे नाव असून कंपनीतील अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.नागपूरच्या चंद्रमणी नगर येथे राहणारा मंथन अभ्यासात हुशार होता. १२ वीचे शिक्षण घेतल्यावर त्याने एविएशन अभ्यासक्रम निवडला. नागपुरात २ वर्षांचा एविएशनचा अभ्यासक्रम सुरु असतानाच 'गो एअर' या हवाई कंपनीत तो ग्राउंड स्टाफ पदावर ९ महिन्यापूर्वी रुजू झाला. १५ दिवसांपासून मंथन आजारी होता. त्यामुळे तो सुट्टीवर घरीच होता. त्याला कावीळ झाल्याचे निदान झाले त्यामुळे त्याला आणखी काही दिवस सुट्टीची आवश्यकता होती. मात्र कंपनीतील अधिकारी आजारी असूनही त्याला कामावर हजार राहण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप मृत मंथनच्या कुटुंबीयांनी केला आहे. कामावर रुजू हो नाही तर नोकरी सोडावी लागेल या तणावातून मंथनने आत्महत्या केल्याचा आरोप मंथनच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मृत मंथनची आई पोलीस दलात कार्यरत आहे तर वडील एक्स रे तंत्रज्ञ असून त्याला एक १२ वर्षाचा लहान भाऊ आहे. गुरुवारी दुपारी ३च्या सुमारास मंथनने त्याच्या राहत्या घरीच बेडरूम मध्ये लोखंडी खिडकीवर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कावीळ झाल्याचे मेडिकल रिपोर्टही कंपनीला देण्यात आले होते तरी त्याला वारंवार कामावर हजर राहण्यासाठी सांगितले जात होते. याप्रकरणी मृत मंथनचा मोबाईल सीडीआर रेकॉर्ड तपासला जाईल तसेच कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांचे जबाब नोंदवल्यावर आत्महत्येचे नेमके कारण समजेल असे पोलिसांनी सांगितले आहे.
गुरुवारी मंथनच्या आईचा वाढदिवस होता. आत्महत्येपूर्वी पोलिसांना एक चिट्ठी सापडली. त्यावर 'हप्पी बर्थ डे मम्मी,सॉरी' एवढेच लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे कंपनीतील अधिकाऱ्यांच्या त्रास की दुसरे काही कारण या आत्महत्येमागे आहे याचा तपास पोलीस करीत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्युच्या गुन्हा दाखल केला आहे.