अमर काणे, झी मीडिया, नागपूर: नागपूरकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या नागपूर मेट्रोचं काम अत्यंत सुस्साट वेगाने सुरू आहे. मेट्रोसाठी देशात पहिलाच चार लेअरचा उड्डाणपूल साकारला जातोय. कामठी मार्गावर एलआयसी चौकापासून सुरू होणारा हा फ्लाय ओव्हर साडेचार किलोमीटरचा असेल.
दरम्यान, नागपूर मेट्रो आता यापुढे झेप घेणार आहे. आता जमिनीपासून 3 थरांचा उड्डाणपूल साकारला जाणार आहे. नागपुरातील कामठी मार्गावरली एलआयसी चौकापासून हा उड्डाणपूल सुरू होणार आहे. शहराच्या विविध भागात जाणाऱ्यांसाठी सर्वात खालती रस्ते, दुसऱ्या थरावर रेल्वेमार्ग, तिसऱ्या थरावर शहराबाहेर जाणाऱ्यांसाठी रस्ते मार्ग आणि सर्वात वर म्हणजे चौथ्या थरावर मेट्रो धावणार आहे.
शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा उड्डाणपूल असेल. स्थापत्यशास्त्राचाही हा एक उत्तम नमुना असेल. तसंच नागपूरची विशेष ओळखही यामुळे निर्माण होईल. मेट्रो रेल्वे इथे जमिनीपासून तब्बल 26 मीटर उंचीवरून धावेल.
नागपूर मेट्रोच्या सुविधेसह शहरात इतरही सुविधा निर्माण होतायत. भविष्यात वाढत जाणारी गर्दी लक्षात घेऊन विविध गोष्टी साकारल्या जात आहेत.