नागपुरातला मोक्षधाम येथील पूल 4 वर्षानंतर खुला

5 कोटींचं काम साडेनऊ कोटींच्या घरात

Updated: Jun 29, 2018, 09:37 PM IST
नागपुरातला मोक्षधाम येथील पूल 4 वर्षानंतर खुला title=

मुंबई : गेल्या चार वर्षांपासून रहदारीसाठी बंद असलेला नागपुरातला मोक्षधाम येथील पूल अखेर खुला झाला आहे. एकदा तयार केलेलं डिझाईन बदलून कामाच्या मंजूर निधीत दुप्पटीने वाढ होऊन हा पूल सुरू केला. दक्षिण आणि मध्य नागपूरला जोडणारा मोक्षधाम इथला नागनदीवरचा पूल मोडकळीस आला होता. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून इथली वाहतूक बंद होती. याचा फटका अनेक व्यापाऱ्यांना बसला. २०१६ मध्ये पुलाच्या कामाचे आदेश काढण्यात आले. त्यासाठी ५ कोटी खर्च अपेक्षित होता. कंत्राटदाराने कामाला सुरूवातही केली. मात्र वर्षभराने कामाचा आराखडाच सदोष असल्याचं लक्षात आल्यावर काम थांबवण्यात आलं. 

पुलाचा नवा आराखडा तयार करण्यात आला. मार्च २०१८ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र वाहतूक सुरू होण्यास जून महिनाअखेर उजाडला आहे. मात्र या प्रकारात ५ कोटींची रक्कम साडेनऊ कोटींच्या घरात गेली. 

नागपूरचे सिमेंटचे रस्ते असोत की मेट्रोचं काम... सगळी कामं वेगात सुरू आहेत. मात्र सामान्यांना ज्याची गरज होती तो पूल मात्र पूर्ण करायला चार वर्षे लागली. कामांची गती अशीच राहिली तर शहराचा विकास मनपा झेपणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.