नाशिक : नाशिक जिल्ह्यातील काही पूल हे धोकादायक असल्यान नाशिकच्या प्रशासनासमोर पुरा बरोबरच नाशिक मधील असलेल्या ब्रिटिशकालीन पूलांची चिंता आहे. जवळपास सहा पूल हे धोकादायक स्थितीत असल्यानं ग्रामस्थांनी वेळोवेळी समांतर आणि उंचीच्या पूलाची मागणी केली आहे मात्र संबंधितांकडून फक्त तात्पुरती डागडुजी केली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये महापुराची परिस्थिती ओढवली तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
सावित्री नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर राज्यातल्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. यात नाशिकमधल्या अनेक पुलांचा समावेश होता. संबंधित प्रशासनाने तातडीने पाऊलं उचलत कामही सुरु केलं होतं. त्यामध्ये प्रथम यादीत सहा पुलांचा समावेश होता. त्याची डागडुजी करण्याचे कामही करण्यात आलं आहे. मात्र अशा पुलांची परिस्थिती बघता स्थानिक नागरिकांनी समांतर पूल करुन मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. मात्र डागडुजी पलीकडे प्रशासनाने अद्यापही ठोस पावलं उचलली नाहीत.
या धोकादायक पुलांमध्ये चांदोरी-सायखेडा, भगूर-पांढुर्ली तसेच घोटी-सिन्नर महामार्गावरील देवळे पुलाचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच पुलांची डागडुजी केली असून यांत सायखेडा-चांदोरी, नाशिक-त्र्यंबक मार्गावरील महिरावणी इथले दोन पूल, दारणा नदीवरील भगूर-पांढुर्लीला जोडणारा पूल, देवळे पूल तसंच मनमाडजवळील पांझण नदीवरील पुलाचा समावेश होता. त्यामुळे या पूलाला कुठलाही धोका नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागानं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान जिल्ह्यात कुठेही धोकादायक पूल नाही आणि कुठलीही समस्या नाही असा दावा करत असलं तरी जिल्ह्यात आणि शहरात अनेक पूलांना अजूनही पर्यायी मार्ग नाही. याशिवाय ऐन पावसाळ्यात महापूर आणि पानवेली धोकादायक होऊ ठरू शकतात. महाडसारख्या दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते. मात्र नाशिकमध्ये असे अनेक पूल असे आहेत की त्यांचा कालावधी संपलाय. मात्र प्रशासन डागडुजी पलीकडे काहीही करत नाही. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल उपस्थित होतो आहे.