नागपुरात पोलिसांना आता शारीरिक आणि आरोग्य क्षमतेनुसार ड्युटी

शारिरिक आणि आरोग्य क्षमतेनुसार ड्युटी मिळणार

Updated: Jan 14, 2020, 05:43 PM IST
नागपुरात पोलिसांना आता शारीरिक आणि आरोग्य क्षमतेनुसार ड्युटी title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : पोट वाढलेल्या, जाड, व्यसनी पोलिसांचे आता धाबे दणाणले आहे. कारण नागपुरात आता शारिरिक आणि आरोग्य क्षमतेनुसार ड्युटी मिळणार आहे. त्यामुळे या पोलिसांची शारीरिक आणि आरोग्य तपासणीही करण्यात येणार आहे. नागपुरातील सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असताना पोलीस हवलदार राजेश कावळे यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळं पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण, त्यामुळे येणारा ताण. त्यातच प्रकृतीची हेळसांड यांमुळे पोलिसांमध्ये हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि अन्य आजारांनी मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे.

मात्र आता या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत नागपूर पोलीस दलातील कर्मचा-यांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवलं जाणार आहे. त्यासाठी पोलीस दलातील हवालदारापासून ते वरिष्ठ पोलीस अधिका-यांपर्यंत सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येते आहे. या तपासणीनंतर त्यांना शतायुषी हे आरोग्य पत्रक देऊन त्यांच्या शारिरिक क्षमतेनुसार ड्युटी देण्यात येणार आहे.

'पोलिसांच जीवन फार स्ट्रेसफुल आहे. यामध्ये अनेक जण आजारातही काम करतात. त्यामुळं अनेकदा त्यांचा जीवही जातो. त्यामुळं आम्ही एक योजना आखली आहे. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांना सी कॅटगरीमध्ये ठेवलं जाईल. त्यानंतर ब्लड प्रेशर आणि डायबिटीज असणाऱ्यांना सी तर फीट असलेल्या पोलिसांना ए कॅटगरीमध्ये ठेवण्यात येणार आहे.' अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. 

पोलिसांच्या आरोग्य कार्डवरून त्यानुसार कर्मचाऱ्यांची यादी पोलीस मुख्यालय, पोलीस नियंत्रण कक्ष आणि कर्मचारी कार्यरत असलेल्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात येईल. त्यांच्या आरोग्यक्षमतेनुसार त्यांची ड्युटी लावण्यात येणार आहे.

खरतरं पोलीस ऑन ड्युटी 24 तास असतो. त्यामुळं अनेकाचं स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. मात्र पोलिसांचे आरोग्य सदृढ रहावे याकरता नागपूर पोलिसांची ही शतायुषी योजना आरोग्याच्या दृष्टीनं नक्कीच फायदेशीर ठरेल.