VIDEO : पेंचमध्ये दोन वाघिणींची झुंज, हद्दीवरुन एकमेकांशी भिडल्या

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प पुन्हा एकदा पर्यटनासाठी खुला झाला आहे. पावसानंतर पेंचमधील व्याघ्र प्रकल्प हिरवळीने नटला आहे. अशा आल्हाददायी वातावरणात दोन वाघिणींच्या झुंजीचा व्हिडीओ समोर आला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 16, 2024, 10:45 AM IST
VIDEO : पेंचमध्ये दोन वाघिणींची झुंज, हद्दीवरुन एकमेकांशी भिडल्या  title=

नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प वाघांच्या अशा डरकाळ्यांनी हादरुन गेलं आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना खुरसापार गेटजवळ दोन वाघिणींच्या झुंजीचा थरार पाहायला मिळाला. बी-2 आणि बिंदू या दोन वाघिणींमध्ये हद्दीवरुन अचानक झुंझ झाली. समांतर अंतरावरुन जाणा-या या दोघी वाघीणी अचानक एकमेकींना भिडल्या त्यांच्या डरकाळ्यांनी संपूर्ण जंगल हादरुन गेलं. थोड्याच वेळात या दोघी वाघीणी आपापल्या वाटेनं निघून गेल्या आहेत. 

पेंच व्याघ्र प्रकल्प 1 ऑक्टोबर मंगळवारपासून जंगल सफारीसाठी खुला झाला आहे. या सफारीचा आनंद विदर्भासह विदर्भाबाहेरील पर्यटक येतात. एवढंच नव्हे तर या ठिकाणी अनेक व्हीव्हीआयपी लोकं देखील हजेरी लावतात. पावसाळ्याच्या दिवसांत हा  व्याघ्र प्रकल्प जंगल सफारीसाठी बंद ठेवण्यात आला होता. या व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करणाऱ्यांना 14 ऑक्टोबरपर्यंत ऑफलाइन पद्धतीने बुकींग करावी लागणार आहे. त्यानंतर ऑनलाइन बुकिंगची सुविधा देखील सुरु केली जाणार आहे. 

पेंच व्याघ्र प्रकल्प 

पेंच व्याघ्र प्रकल्प , 1975 मध्ये स्थापन करण्यात आला. त्यानंतर 1992 मध्ये प्रकल्प व्याघ्र अंतर्गत व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले , हे मध्य भारतातील सातपुडा पर्वताच्या दक्षिणेकडील विस्तारांमध्ये वसलेले संरक्षित क्षेत्र आहे. त्याच्या हद्दीत इंदिरा प्रियदर्शिनी पेंच राष्ट्रीय उद्यान, पेंच मोगली अभयारण्य (पर्यटनासाठी खुले नाही) आणि बफर जंगल आहे.

पहिला प्लास्टिक मुक्त व्याघ्र प्रकल्प 

राज्यातील पहिला प्लास्टिक मुक्त (Plastic Free) व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य झाले आहे. पर्यटकांकडून जंगलात नेल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू आणि खास करून प्लास्टिक बॉटल्समुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने पर्यटकांच्या प्लास्टिक बॉटल्सवर पेंच मध्ये पूर्णपणे बंदी घातली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या प्रत्येक दारावर रोज शेकडोच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकाकडून त्यांच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल्स (Plastic Bottle) काढून घेतल्या जातात आणि पेंचच्या व्यवस्थापनाकडून काचेच्या बॉटल्समध्ये शुद्ध आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.