नांदेड : व्ही व्ही पॅट मशीन पडले बंद, प्रभाग क्रमांक २ मधील ६ मतदान केंद्रांवर व्ही व्ही पॅट मशीन बंद पडले. त्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. गोंधळामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
व्ही व्ही पॅट मशीन बदलीची प्रक्रिया सुरु होती. प्रभाग क्रमांक २ मधील ३७ मतदान केंद्रांवर व्ही व्ही पॅट मशीनचा वापर केला जातोय. दरम्यान, एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांना मतदानासाठी तात्पुरता जामीन देण्यात आला. मतदान करण्यासाठी न्यायालयाने दोन तासासाठी जामीन दिला. जुन्या नांदेडातील हतई परिसरात सय्यद मोईन यांनी मतदान केले.
नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी ८१ जागांसाठी ५७८ उमेदवार रिंगणात असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नांदेड महापालिकेसाठी आज मतदान होतंय. निवडणूक आयोगाची मतदानासाठी जय्यत तयारी केलीये. महापालिकेच्या ८१ जागांसाठी ५७८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शहरातल्या ५५० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडत आहे.
त्यासाठी ३ हजार ४०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २० प्रभागांमधल्या ८१ जागांसाठी ३ लाख ९६ हजार ८७२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनानं विविध माध्यमांतून जनजागृतीही केली आहे.