राणेंच्या भाजपप्रवेशाची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा

काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त जसजसा जवळ येतोय, तशी सिंधुदुर्गातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चुळबुळ सुरू झालीय. राणे भाजपवासी झाल्यास कोण कोण त्यांच्यासोबत जाणार, याची चर्चा रंगू लागलीय. भाजप कार्यकर्त्यांनीही आपलं काय, अशी सावध चाचपणी सुरू केलीय.

Updated: Aug 18, 2017, 07:49 PM IST
राणेंच्या भाजपप्रवेशाची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा title=

विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग : काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त जसजसा जवळ येतोय, तशी सिंधुदुर्गातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चुळबुळ सुरू झालीय. राणे भाजपवासी झाल्यास कोण कोण त्यांच्यासोबत जाणार, याची चर्चा रंगू लागलीय. भाजप कार्यकर्त्यांनीही आपलं काय, अशी सावध चाचपणी सुरू केलीय.

सिंधुदुर्गात सध्या एकच चर्चा रंगलीय... गणपतीची प्राणप्रतिष्ठा आधी होणार की, नारायण राणेंचा भाजपप्रवेश? एकीकडं गणेशोत्सवाची धामधूम सुरूय. तर दुसरीकडं राजकीय ढोलताशे वाजू लागलेत. कोणता झेंडा घेऊ हाती? याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम कमी कमी होत चाललाय. येत्या 22 ऑगस्टला नारायण राणेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त काढण्यात आल्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, राणेंच्या वारंवारच्या पक्षबदलांमुळं काही कार्यकर्ते संभ्रमात आहे. तर जुने काँग्रेसवाले मूळ पक्षातच राहणार असल्याचं खासगीत सांगतायत.

दुस-या बाजूला भाजपमध्येही जोरदार धुमशान रंगणाराय... राणेंना सोडून अलिकडेच भाजपमध्ये गेलेले राजन तेली, संदेश पारकर, काका कुडाळकर यांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचंही राजकीय अस्तित्व धोक्यात येणाराय. कारण राणे भाजपात गेल्यास आमदार पुत्र नितेश पुन्हा कणकवलीतून निवडणूक लढवतील. तसं झाल्यास जठार शिवसेनेचा पर्याय तर स्वीकारणार नाहीत ना, अशीही चर्चा ऐकायला मिळतेय...

एकूणच गणेशोत्सवाच्या धामधुमीत सिंधुदुर्गातलं राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय. राणेंच्या पक्षबदलामुळं सिंधुदुर्गात मोठी राजकीय उलथापालथ होईल, एवढं नक्की...