'मोदी सरकार येणार नाही, देशाचा पंतप्रधान हे ठरवणार'

देशात मोदींच्या विरोधात प्रवाह वाहतोय. काहीही झाले तरी आता मोदी सरकार या देशात येणार नाही. 

Updated: Apr 13, 2019, 07:51 PM IST
'मोदी सरकार येणार नाही, देशाचा पंतप्रधान हे ठरवणार' title=

जळगाव : भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीवर पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून होणाऱ्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जळगावात प्रत्युत्तर दिले आहे. या देशात मोदींच्या विरोधात प्रवाह वाहतोय. काहीही झाले तरी आता मोदी सरकार या देशात येणार नाही. त्यानंतर राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती असे सारे एकत्र येऊन या देशाचा पंतप्रधान कोण होईल ते ठरवतील, असा दावा भुजबळ यांनी केला आहे.

मात्र, मोदी म्हणतात की तुमचा पंतप्रधान कोण आहे, ते आधी सांगा. आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी अनेक चांगले उमेदवार आहेत. राहुल गांधी, शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात. ममता बॅनर्जी किंवा मायावती देखील पर्याय आहेत. मनमोहन सिंग आहेत ना आमच्याकडे. तुमच्यापेक्षा चांगले काम करणारे उमेदवार आमच्याकडे आहेत, असे छगन भुजबळ यावेळी भाजपला ठासून सांगितले. 

जळगाव लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ आज दुपारी जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भुजबळ बोलत होते. सभेला उमेदवार गुलाबराव देवकर, आमदार डॉ. सतीश पाटील, माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे, माजी आमदार दिलीप वाघ, राजीव देशमुख आदी उपस्थित होते.