Nashik Knife Attack: भरोसा कक्षाबाहेरच विश्वास’घात’! मुलीच्या मामाने तरुणाला पोलिसांसमोरच भोसकले

Nashik Crime News: नाशिक शहरातील महिला सुरक्षा कक्षाबाहेर रंगला थरार. मुलीच्या मामाने केला थेट महिला पोलिसांच्या समोर हल्ला केल्याची घटना घडली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 28, 2023, 07:56 PM IST
Nashik Knife Attack: भरोसा कक्षाबाहेरच विश्वास’घात’! मुलीच्या मामाने तरुणाला पोलिसांसमोरच भोसकले title=
Nashik Attempt Murder Video Husband Attacks wife in presence of police

योगेश खरे, झी मीडिया

Nashik News: नाशिक शहरात (Nashik Crime News) दिवसाढवळ्या एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नाशिक शहरातील महिला सुरक्षा कक्षातील भरोसा सेलबाहेर एका व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे, महिला पोलिसांच्या समोरच हत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Nashik Crime News Today)

मुलीच्या मामानेच केला हत्येचा प्रयत्न

नाशिक शहरातील महिला सुरक्षा कक्षातील भरोसा कक्षाबाहेर पती-पत्नीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पती-पत्नीच्या वादातून महिलेच्या मामाने पतीला सुऱ्याने भोसकत हत्येचा प्रयत्न केला. मुलीच्या मामाने थेट महिला पोलिसांच्या उपस्थितच हल्ला केला आहे. आरोपीचे नाव नानासाहेब नारायण ठाकरे असं आहे. शरणपूर परिसरातील भरोसा महिला कक्षाबाहेर हा थरार घडला आहे.

पती-पत्नींमधील वाद टोकाला

पती-पत्नी दोघांमध्ये वाद आहेत. त्यामुळं दोघांचे समुपदेशन सुरु आहे. आज दोघांचीही तिसरी तारीख होती. त्याचवेळी दोघांमध्ये वाद झाले. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मुलीचा मामा यात मध्ये पडला आणि त्याने महिला सुरक्षा कक्षातच पतीवर चाकुने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. संतोष पंडित असं जखमी पतीचे नाव असून दहिवड ता देवळा येथील रहिवाशी आहे.  

मुलीच्या मामाने केलेल्या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला आहे. तरुणावर चाकूने वार केल्यामुळं भरोसा कक्षाबाहेर रक्ताचा सडा पडला होता. घटनेनंतर आरोपीने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कक्षेत महिला पोलिस असल्यांनी त्यांनी त्याला तातडीने पकडले व पोलिसांच्या हवाली केले. 

आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे. तर, गंभीर जखमी झालेल्या पतीला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, महिला पोलिसांच्या भरोसा कक्षात असा प्रकार घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. 

भरोसा सेल म्हणजे काय?

पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस यंत्रणेमार्फत भरोला सेल सुरु करण्यात आलं आहे. माध्यमातून पीडित महिलांना विश्वास व मानसिक आधार देण्याचे काम होते. अनेक पती-पत्नींमधील भांडण तंटा सोडवण्यासही भरोसा सेलची मदत होती. दोघांचे समुपदेशन करुन दोघांमधील वाद सोडवण्यात येतो.