योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमधून (Nashik Crime) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये उजव्या पायातील रॉड काढण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या डावा पाय कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक रोड परिसरात असलेल्या एका रुग्णालयात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमधील वयोवृद्ध कर्मचाऱ्यासोबत ही घटना घडल्यानंतर मॅग्नम रुग्णालयामधील डॉक्टरविरोधात पोलिसांत (Nashik Police) निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टर विपुल काळे असे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टर विपुल काळे यांच्या निष्काळजीपणामुळेच आपण दोन्ही पायांनी अधू झाल्याचे पीडित रुग्णाचे म्हणणे होते. रुग्णाच्या तक्रारीनंतर जिल्हा रुग्णालय अहवालावरुन उपनगर पोलीस ठाण्यात कलम 337 व 338 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबियांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दोन ते तीन महिन्यांनंतर हा गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता रुग्णालयावर देखील गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी पीडित व्यक्तीने केली आहे.
सुभाष काशिनाथ खेलूकर (59, रा. रुद्रप्रेम अपार्टमेंट, दसकगाव, जेलरोड, नाशिकरोड) यांनी याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, खेलूकर यांच्या उजव्या पायात रॉड टाकण्यात आलेला होता. तो काढण्यासाठी त्यांनी नाशिक-पुणे मार्गावरील नामांकित हॉस्पिटलमध्ये डॉ. विपुल काळे यांचे मार्गदर्शन घेतले होते. त्यानुसार, शस्त्रक्रिया करून रॉड काढण्याचा निर्णय झाला होता. खेलूकर हे 27 मे 2023 रोजी रुग्णालयामध्ये दाखल झाले होते. डॉ. काळे यांना खेलूकर यांच्या उजव्या पायाची शस्त्रक्रिया करावयाची आहे, हे माहीत होते. तरीही प्रत्यक्षात डॉ. काळे यांनी खेलूकर यांच्या उजव्याऐवजी डाव्या गुडघ्यावर कापून जखम केली आणि नंतर टाके घातले.
शस्त्रक्रियेनंतर काही वेळाने शुद्ध आल्यानंतर खेलूकर यांना दोन्ही पाय हलत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी डॉक्टरांना बँडेज काढायला लावल्यानंतर उजव्याऐवजी डाव्या पायावर शस्त्रक्रिया केल्याचे त्यांच्या लक्षात आले. डॉ काळे यांनी चुकून दुसऱ्या पायाला ब्लेड लागले असल्याचे सांगत वेळ मारून नेली. मात्र खेलूकर यांचे दोन्ही पाय अधू झाल्याने त्यांना चालणे अवघड झाले होते. त्यामुळे त्यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरुन डॉ. विपुल काळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याबाबत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय तज्ञ समितीकडून या घटनेचा अहवाल मागवला होता. दोन महिन्यानंतर आलेल्या अहवालात डॉक्टर जोशी असल्याचं निर्वाळा देण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.