डॉक्टर पत्नीची हत्या करुन पती अन् सासऱ्याने रचला अपघाताचा बनाव; समोर आलं धक्कादायक कारण

Nashik Crime : नाशिकच्या नांदगावमध्ये डॉक्टर पतीने डॉक्टर असलेल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पतीने पत्नीच्या अपघाती मृत्यूचा बनाव रचला होता असा आरोप मृत महिलेच्या भावाने केला आहे.

नीलेश वाघ | Updated: Oct 12, 2023, 10:05 AM IST
डॉक्टर पत्नीची हत्या करुन पती अन् सासऱ्याने रचला अपघाताचा बनाव; समोर आलं धक्कादायक कारण title=

निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक : नाशिकमधून (Nashik Crime) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. डॉक्टर असलेल्या पतीने डॉक्टर पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव पतीने रचला होता. मात्र आपल्या तिची हत्या झाल्याचा आरोप डॉक्टर महिलेच्या भावाने केला आहे. पोलिसांनी (Nashik Police) याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरीमध्ये अपघाताचा बनाव करून वडिलांच्या मदतीने डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीची हत्या केल्याच्या तक्रार मयत डॉक्टर महिलेचा भाऊ सचिन कैलास साळुंखे याने दिल्याने खळबळ उडाली आहे. डॉक्टर भाग्यश्री शेवाळे असे अपघातात मृत झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. भाग्यश्रीचा अपघाती मृत्यू झालेला नसून तिची पतीसह सासऱ्याने दगडाने ठेचून हत्या केल्याची फिर्याद नांदगाव पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाग्यश्री शेवाळे यांचा पती डॉ. किशोर नंदू शेवाळे आणि त्याचे वडील नंदू राघो शेवाळे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

भाग्यश्री शेवाळे यांच्या भावाच्या तक्रारीनंतर अपघाताचा बनाव उघडकीस आला असून तब्बल 15 दिवसांनी खुनाच्या प्रकरणास वाचा फुटली आहे. 27 सप्टेंबरला मन्याड फाटा या ठिकाणी दुचाकीचा अपघात झाल्यानंतर या अपघातात डॉक्टर भाग्यश्री मृत्युमुखी पडल्याची माहिती तिचा पती डॉक्टर किशोर शेवाळे याने चाळीसगाव पोलिसांना दिली होती. चाळीसगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत हा गुन्हा नांदगाव पोलिसांकडे वर्ग केला होता.

दरम्यान, डॉक्टर भाग्यश्री हिच्याकडे दवाखाना बांधण्यासाठी माहेराहून 25 लाख रुपये आणण्याची मागणी केली जात होती. ही मागणी पूर्ण झाली नाही म्हणून बापलेकाने संगनमताने तिची हत्या केली असा आरोप डॉक्टर भाग्यश्री हिच्या भावाने फिर्यादीत केला आहे. भाग्यश्री हिच्याकडून मागणी पूर्ण न झाल्याने आरोपी डॉ किशोर नंदू शेवाळे व त्यांचे वडील नंदू राघो शेवाळे यांनी संगनमताने व विचारपूर्वक फिर्यादीची बहीण डॉक्टर भाग्यश्री हिला दगडाने ठेचून व काचेची बाटली मारून जीवे ठार मारल्याचा आरोप सचिन साळुंखे यांनी केला आहे.