Nashik Income Tax Department Raid : नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सराफा व्यावसायिकाच्या दुकानावर आणि डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाने छापेमारी केली आहे. यात तब्बल 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले. यामुळे परिसरातील सर्वच व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
नाशिकमधील सुराणा ज्वेलर्स सराफी व्यावसायिकाच्या कॅनडा कॉर्नर येथील ज्वेलर्स दुकानासह आणि त्याच्याच डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाने छापा टाकून सलग 30 तास तपासणी केली. नाशिक, नागपूर, जळगावमधील आयकर पथकाने ही कारवाई केली. यावेळी जवळपास 50 ते 55 अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापासत्र सुरु केले. त्याचवेळी त्यांच्या राका कॉलनी येथे असलेल्या आलिशान बंगल्यातही आयकर विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आलीत.
यासोबतच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली.
गुरुवारी (23 मे) संध्याकाळी सहाच्या सुमारास नाशिकमधील सुराणा ज्वेलर्स सराफी व्यावसायिकाच्या दुकानावर आयकर विभागाच्या अन्वेषण पथकाने छापेमारी केली. आयकर विभागाने अचानक केलेल्या या छापेमारीमुळे परिसरासह सर्वच व्यावसायिकांचे धाबे दणाणले. यात तब्बल 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले.
आयकर अन्वेषण विभागाचे महानिर्देशक सतीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त निर्देशकांच्या निगराणीखाली नाशिक, नागपूर, जळगावच्या अन्वेषण पथकाने ही कारवाई केली. या पथकातील सुमारे 50 ते 55 अधिकाऱ्यांनी हे छापेसत्र केले. तसेच मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करत रोख रक्कम, मालमत्तांचे दस्तऐवज पथकाने जप्त केले. दीड दिवसाच्या कारवाईत मालमत्तांचे दस्तावेज असलेले पेन ड्राइव्ह आणि हार्डडिस्क जप्त करण्यात पथकाला यश आले.