Nashik LokSabha : मंदिरांच्या नगरीतील साधू महंत राजकीय आखाड्यात; 'या' कारणासाठी लढवणार निवडणूक

Nashik LokSabha Election 2024 : दर बारा वर्षांनी होणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळा नगरीत आता महंत राजकीय लढतीसाठी तयार आहेत. नाशिक लोकसभेच्या जागेसाठी तीन महंत विविध पक्षांकडून खासदारकीसाठी इच्छुक असून राजकीय आखाड्यात उतरले आहेत.

सौरभ तळेकर | Updated: Mar 23, 2024, 08:30 PM IST
Nashik LokSabha : मंदिरांच्या नगरीतील साधू महंत राजकीय आखाड्यात; 'या' कारणासाठी लढवणार निवडणूक title=
Nashik LokSabha Election 2024

सोनू भिडे, झी 24 तास, नाशिक प्रतिनिधी : लोकसभा निवडणुका (LokSabha Election 2024) जाहीर झाल्यानंतर आता नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठकांना वेग आलाय. तर अनेक नेते दिल्लीचे उंभरठे झिजवताना दिसत आहेत. त्यामुळे तिकीट कोणाला मिळणार? यावर जोरदार चर्चा सध्या राज्यात होताना दिसतेय. अशातच आता नाशिक शहर आणि शहरापासून 35 किलोमीटर लांब असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीत दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. येत्या 2027 साली नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभेसाठी स्वामी शांतिगिरी महाराज, स्वामी श्री कंठानंद आणि महंत सिद्धेस्वरानंद सरस्वती (Mahant Siddheswarananda Saraswati) हे राजकीय आखाड्यात उतरले आहेत. 

कोण आहेत महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती 

त्र्यंबकेश्वर येथील श्रीराम शक्तिपीठ संस्थानचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांचे शिष्य महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती... वयाच्या 21 व्या वर्षी ते अध्यात्माकडे वळाले. आता पर्यंत त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहे. राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी आपण निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केल आहे. त्र्यंबकेश्वरमधील सर्व साधू आखाड्यांच्या महंतांनी शुभेच्छा देत समर्थन दिल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. 

स्वामी कंठानंद आणि शांतिगिरी लोकसभेसाठी इच्छुक

श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थानचे स्वामी श्री कंठानंद यांची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाशी भेटी घेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी इच्छा व्यक्त केली. यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आपला मार्ग सुकर केला. 

स्वामी शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी आहेत. महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघात स्वामी शांतिगिरी महाराजांचे ११५ आश्रम आहेत. तर 35 विधानसभा मतदारसंघात सात  गुरुकुलांच्या माध्यमातून ते हजारो विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देतात. त्यांचा लाखोंचा भक्त परिवार आहे. २००९ मध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणुक लढविली होती. तर ह्या वर्षी नाशिक लोकसभेसाठी ते इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी भाजपा शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांशी गुप्तगू झाले असून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे.

राजकीय वर्चस्व आणि भवितव्य

तीनही महंतांमध्ये स्वामी शांतिगिरी महाराज यांचे राजकीय वर्चस्व आणि ताकद मोठी आहे गेल्यावेळी संभाजीनगर मधून उमेदवारी केल्याने शिवसेनेचे खैरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता तर त्याचा फायदा भागवत कराड यांना झाला होता. यावेळीही भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या कराड यांना स्वामी शांतिगिरी यांचा पाठिंबा आवश्यक आहे त्यासाठी भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्वामी शांतिगिरी यांना उमेदवारी देण्यास आग्रही आहे. असे केल्याने लोकसभेतील सात मतदारसंघात आणि विधानसभेतील उपस्थित मतदार संघात भाजपाच्या विजयाचा मार्ग सुकर होणार आहे.

दरम्यान, 2027 साली नाशिक शहरात कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्याच्या आखाड्यात संपूर्ण देशभरातील साधू महंत नाशिक शहरात दाखल होणार आहेत. मात्र तत्पूर्वी रंगणाऱ्या लोकसभेच्या आखाड्यात खासदार साधू महंत दिसले तर आश्चर्य वाटायला नको.