मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : नाशिक महापालिकेत आता बंदुकधारी सुरक्षा रक्षक तैनात होणार आहेत. एकूण ४५ सुरक्षा रक्षकांची नेमणूक होणार आहे. त्यापैकी १७ बंदूकधारी असतील. या निर्णयावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
नाशिक महापालिका मुख्यालयाच्या सेवेतील सुरक्षा रक्षकांना इतरत्र हलवून खासगी बंदूकधारी सुरक्षा रक्षक तैनात केले जाणार आहेत. महापालिकेच्या सेवेत सध्या १३८ सुरक्षारक्षक आहेत. मात्र ही सुरक्षा व्यवस्था तोकडी पडत असल्याचा मनपाचा दावा आहे.
दीड महिन्यांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी थेट मनपा आयुक्तांवरच हात उगारला होता. त्या हल्ल्याची राज्यभर चर्चा झाली. नवरात्रोत्सव काळात उभारण्यात येणाऱ्या गाळ्यांच्या लिलावावरून चार दिवसांपूर्वीच पालिका मुख्यालयात हाणामारी झाली होती.
नगरसेवकाने मारहाण केल्याचा आरोप केल्याने मनपाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. चार महिन्यांपूर्वी एका अतिउत्साही कार्यकर्त्याने कमरेला बंदुक लावून मनपा मुख्यालयात प्रवेश केला. महापालिकेचे सुरक्षा रक्षक असताना हा प्रकार घडल्याने खासगी सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेतला जातोय.
महापालिकेच्या १३८ सुरक्षा रक्षकांव्यतिरिक्त जिल्हा सुरक्षा मंडळाचे १७४ सुरक्षा रक्षक मनपाच्या सेवेते आहेत. एवढी सुरक्षा असतानाही खासगी सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज आहे का असा प्रश्न विचारला जातोय.
मनपाच्या कर्मचा-यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत तर नव्या कर्मचा-यांना देण्यासाठी पैसे कुठून उभारणार ? जे सुरक्षा रक्षक सध्या मनपा सेवेत आहेत त्यांना कुठे वर्ग करणार ? बंदूकधारी खासगी सुरक्षा रक्षकांचा सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही ना असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मनपात झालेलं प्रत्येक आंदोलन, गोंधळ हा राजकीय पक्षांनी केलाय. सर्वसामान्यांमुळे कधीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला नाही. त्यामुळे राजकीय पक्षांना आपल्या कार्यकर्त्यांना आवरण्याची ताकीद देण्याऐवजी खासगी सुरक्षा रक्षकांचा भार मनपावर आणि पर्यायाने सर्वसामान्य करदात्यांवर भार का टाकला जातोय असा प्रश्न उपस्थित होतोय.