शिक्षक आहेत की जेलर! दहावीच्या विद्यार्थ्यांना अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण

इंग्रजी शाळेतील मुख्याध्यापकाने दहावीत शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना 

Updated: Mar 1, 2022, 06:37 PM IST
शिक्षक आहेत की जेलर! दहावीच्या विद्यार्थ्यांना अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण  title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक :  नाशिकमधल्या जेल रोड  भागात असणाऱ्या एका इंग्रजी शाळेतील मुख्याध्यापकाने दहावीत शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिला मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

काही विद्यार्थ्यांकडून वर्गाची काच फुटली. त्यामुळे संतापलेल्या मुख्याध्यापकाने वर्गातील पाच ते सहा मुलांना काठीने जबर मारहाण केली. इतकंच नाही तर विदयार्थ्यांकडे पाच हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. याविरोधात पालकांनी पोलिसात धाव घेतली.

पोलिसात जाल तर मुलांचं दहावीचं वर्ष वाया घालवून अशी धमकी दिल्याचंही पालकांनी म्हटलं आहे. त्यामुळे काही विद्यार्थी पोलिसात तक्रार देण्यास घाबरत असल्याचंही पालकांचं म्हणणं आहे. 

विद्यार्थ्यांच्या हातावर, पोटावर आणि डोक्याने काठीने इतकी मारहाण केली आहे की मुलांच्या अंगावर वळ उठले आहेत, असं पालकांनी म्हटलं आहे. आम्ही शिक्षेच्या विरोधात नाही, शिक्षेशिवाय विद्यार्थी घडू शकत नाहीत, पण शिक्षा करण्याची एक मर्यादा हवी असं पालकांचं म्हणणं आहे. 

p>

 

मुख्याध्यापकांशी चर्चेला गेलेल्या पालकांच्या हातातले मोबाईलही शाळेने हिसकावून घेतले, आणि आताच्या आता पाच हजार रुपये भरून द्या असं फर्मान सोडलं.  

विशेष म्हणजे या शाळेविरुद्ध आतापर्यंत 15 ते 20 तक्रारी दाखल झाल्या आहेत, पण शाळेवर एकही कारवाई झालेली नाही, इतकंच नाही तर ही शाळा अनिधिकृत असून हे प्रकरण कोर्टात सुरु असल्याची माहितीही काही पालकांनी दिली आहे.