पुरात सेल्फी काढणं पडलं महागात, नाशिकमध्ये गुन्हे दाखल

सेल्फी काढताना जगण्याचं भान सुटू देऊ नका.

Updated: Aug 8, 2019, 07:39 PM IST
पुरात सेल्फी काढणं पडलं महागात, नाशिकमध्ये गुन्हे दाखल title=

किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये पुरासोबत सेल्फी काढणं अनेकांना पडलं चांगलंच महागात पडलं आहे. अतिउत्साही सेल्फी वेड्यांवर पोलिसांनी थेट गुन्हेच दाखल केले आहेत. कुठेही, कुठल्याही परिस्थितीत सेल्फी काढायलाच हवा, अशा मताचे आज अनेक जण आहेत. सध्या नाशिकमध्ये प्रचंड पाऊस आहे. त्यामुळे या सेल्फीप्रेमींना पाण्याचं निमित्त मिळालं आहे. गोदावरीचा तट, होळकर पूल, कन्नमवार पूल या ठिकाणी सगळे हवशे, नवशे, गवशे पाणी पाहायला येतात.

कुठल्याही क्षणी पाण्याचा जोर वाढेल आणि पाणी कवेत घेईल, हे माहीत असताना, अशा धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नका, असं कानीकपाळी ओरडून सांगितलेलं असतानाही ही सेल्फी ब्रिगेड कुणाचंही ऐकत नाही. आता शेवटी या सेल्फीवेड्यांना आवरण्यासाठी नाशिकमध्ये पोलिसांनी धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणाऱ्यांवर कारवाई सुरू केलीय. अशा ३३ जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

नाशिकमध्ये सेल्फी वेड्यांवर ही कारवाई ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. सेल्फी काढताना जगण्याचं भान सुटू देऊ नका.